(दापोली)
दापोलीमध्ये राजकीय उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळत आहे, उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी वेगळी चूल मांडल्याने सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. हा धक्का अजित पवार यांच्यासह सुनिल तटकरे यांना देखील मानला जातो. तटकरे या मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांनी घेतलेली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्का मानला जात आहे. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या गटाला मान्यता दिली आहे आणि उपनगराध्यक्ष खालीद रखांगे या गटाचे प्रमुख म्हणून निवडले गेले आहेत. अद्याप तरी या नगरसेवकांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांनी घेतलेला हा निर्णय केवळ अजित पवार यांना तर महायुतीसाठी देखील धक्का आहे असे म्हटले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात नेत्यांचे दौरे वाढले आहेत. शक्तीप्रदर्शन, सभा यांनी सध्या कोकणचं राजकीय आभाळ भरून गेलं आहे. मतदारसंघावर होत असलेले दावे – प्रतिदावे, शक्ती प्रदर्शन यांनी साऱ्या गोष्टी ढवळून निघत आहेत. कोकणात प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमवणे आणि दाखवण्याच्या मागे लागला आहे. त्यात दोन्ही राष्ट्रवादी देखील कुठं मागे नाहीत. शरद पवार आणि अजित पवार यांनी नुकताच कोकण अर्थात चिपळूण – संगमेश्वर या मतदारसंघाचा दौरा केला.
या ठिकाणी असलेले विद्यमान आमदार शेखर निकम सध्या अजित पवार यांच्यासोबत आहेत, तसं म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कोकणात फार मोठी नाही. पण, चिपळूण – संगमेश्वर मतदारसंघातील उमेदवारी, विजय यासाठी सध्या दोन्ही बाजूनं जोर लावला जात आहे. अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर शरद पवार यांचा देखील दौरा झाला.पण, अजित पवार यांची पाठ फिरताच कोकणात त्यांना मोठा धक्का बसला आहे. दापोली नगरपरिषदेतील आठ पैकी सात नगरसेवकांनी थेट आपला वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.