(रत्नागिरी /प्रतिनिधी)
संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने सुनावलेल्या दहा वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने स्थगिती दिली आहे. या प्रकरणातील दोषी आरोपी विनोद भिकू मुदगल याचे अपील प्रलंबित असल्याने, अंतिम निकाल लागेपर्यंत त्याची ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश न्यायमूर्ती नीरज पी. धोटे यांनी दिले.
अभियोग पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पिठाची गिरणी चालवत असून तिचा आणि आरोपी विनोद मुडगल याच्यात पूर्वीपासून वाद होता. १४ मे २०२२ रोजी ही महिला आपल्या घरात काम करत असताना आरोपीने तेथे येऊन तिचा गळा दाबला. या हल्ल्यात महिलेच्या नाकातून रक्तस्राव होऊन ती बेशुद्ध पडली होती. शुद्धीवर आल्यानंतर तिने संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा क्रमांक ६८/२०२२ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने १९ जानेवारी २०२६ रोजी मुडगल याला दोषी ठरवून दहा वर्षांची सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती.
सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला मूदगल याने कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये फौजदारी अपीलाद्वारे आव्हान दिले. तसेच अपीलाचा अंतिम निकाल लागेपर्यंत शिक्षेला स्थगिती देऊन जामीन मिळावा, यासाठी अंतरिम अर्ज केला होता. सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने, पूर्ववैमनस्यातून हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा केला. तसेच वैद्यकीय पुराव्यांनुसार पीडित महिलेला झालेल्या दुखापती या साध्या स्वरूपाच्या असून त्या जीवघेण्या नव्हत्या, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याउलट, गुन्ह्याचे गांभीर्य पाहता सत्र न्यायालयाची शिक्षा योग्यच असून आरोपीला दिलासा देऊ नये, असा जोरदार युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती नीरज पी. धोटे यांनी पीडितेची साक्ष, वैद्यकीय पुरावे आणि आरोपीने कारागृहात व्यतीत केलेला कालावधी विचारात घेतला. वैद्यकीय पुराव्यांनुसार दुखापती जीवघेण्या नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच आरोपीने आतापर्यंत ४ वर्षे ७ महिने कारावास भोगला असून, २०२६ मधील या अपीलाची अंतिम सुनावणी नजीकच्या काळात होण्याची शक्यता कमी असल्याचे नमूद करत न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली. यासोबतच ३० हजार रुपयांचा जातमुचलका आणि एक किंवा दोन जामीनदारांच्या अटीवर त्याची मुक्तता करण्याचे निर्देश दिले.
दोषसिद्धी कायम, केवळ शिक्षेला स्थगिती
अपील लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी आरोपीने न्यायालयाला सहकार्य करावे, अशी अट घालतानाच मूळ खटल्याची कागदपत्रे आणि ‘पेपरबुक’ मागवण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, या आदेशामुळे आरोपीची दोषसिद्धी रद्द झालेली नसून त्याची निर्दोष मुक्तताही झालेली नाही; तर केवळ अपीलाचा अंतिम निर्णय होईपर्यंत शिक्षेच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.


