( नागोठणे / वार्ताहर )
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे हद्दीत भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडत नसून महामार्गावरून पायी चालणाऱ्या ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास हॉटेल रुचीच्या पुढे हा अपघात घडला. टायगर स्पोर्ट्स मोटारसायकलने धडक दिल्याने तुळसाबाई ठमा कोळी यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण दत्ताराम सुरवसे (वय ३४, रा. बोरिवली) हे एमएच ४७ बीएम ००३३ क्रमांकाच्या टायगर स्पोर्ट्स मोटारसायकलवरून मुंबईकडून गोव्याच्या दिशेने प्रवास करीत होते. नागोठणे हद्दीतील हॉटेल रुचीच्या पुढे महामार्गावरून पायी चालत असलेल्या तुळसाबाई कोळी (वय ६२, रा. कोळीवाडा) यांना त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हेमंत कुथे पुढील तपास करीत आहेत.
अपघात घडलेल्या ठिकाणाच्या परिसरात नागरिक तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने महामार्गावरून ये-जा करतात. त्यामुळे वाहनांची वर्दळ आणि पादचाऱ्यांची रहदारी लक्षात घेता येथे सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. या ठिकाणी मोठे गतिरोधक बसवावेत, अशी मागणीही जोर धरत आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


