(चिपळूण/ रत्नागिरी)
शहरातील काही भागांत सुरू असलेल्या मचूळ आणि खाऱ्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून चिपळूण नगरपरिषदेसमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या ठिकाणी शुक्रवारी जोरदार शाब्दिक चकमक उडाली. उपोषणकर्ते नगरसेवक साजिद सरगुरोह आणि नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यात ‘महायुती’च्या उल्लेखावरून वादाची ठिणगी पडली. यामुळे उपोषणस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शहरातील गोवळकोट, गोवळकोट रोड, पेठमाप, उक्ताड आणि बाजारपेठेतील काही भागांत गेल्या काही दिवसांपासून मचूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या प्रश्नावर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी २५ नोव्हेंबरपूर्वी शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत पूर्तता न झाल्याने नगरसेवक साजिद सरगुरोह यांनी स्थानिक नागरिकांसह बुधवारपासून नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. गोवळकोट व पेठमापच्या ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत, तर महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
आंदोलकांची भेट घेण्यासाठी उपोषणस्थळी आलेल्या नगराध्यक्ष सकपाळ यांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्नशील असल्याचे सांगितले. या चर्चेदरम्यान सरगुरोह यांनी ‘महायुती’चा उच्चार करताच नगराध्यक्ष सकपाळ चांगलेच संतापले. उपोषणाच्या माध्यमातून राजकारण करू नका, असे खडेबोल सुनावत “गेली चाळीस वर्षे हा प्रश्न का सुटला नाही? आम्ही अहोरात्र मेहनत घेत असताना तुम्ही झोपला होतात का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. यावर “निवडून येऊनही जनतेला शुद्ध पाणी देता येत नसेल, तर हे चिपळूणचे दुर्दैव आहे,” असा जोरदार पलटवार सरगुरोह यांनी केल्याने वातावरण अधिकच तापले. अखेरीस, जो काही निर्णय घ्याल तो लेखी स्वरूपात देण्याची आग्रही मागणी सरगुरोह यांनी केल्यानंतर नगराध्यक्षांनी प्रशासनाला तसे पत्र देण्याच्या सूचना केल्याने तणाव निवळला.
यावेळी नगराध्यक्ष सकपाळ यांनी पाणीपुरवठ्याच्या सद्यस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले. “ग्रॅव्हिटी पाणी योजनेंतर्गत जुन्या पुलावर जलवाहिनी टाकण्यात आली होती; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ऐनवेळी ती हटवावी लागली. आता पर्यायी व्यवस्था म्हणून गोवळकोट रोड, पेठमाप व उक्ताड परिसरात खेड साठवण टाकीतून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असून, त्याची दोन-तीन दिवस चाचणी सुरू आहे. मात्र, गोवळकोट गाव उंचावर असल्याने तेथे या टाकीतून पाणी पोहोचवणे शक्य नाही. त्यामुळे नदीला शुद्ध पाणी उपलब्ध असेल तेव्हाच गोवळकोट जॅकवेलमधून तेथे पुरवठा केला जाईल,” असे सकपाळ यांनी स्पष्ट केले. यावर सरगुरोह यांनी ग्रॅव्हिटी योजनेसोबतच गांधारेश्वर येथील नियोजित जॅकवेलचे कामही तातडीने पूर्ण करण्याची मागणी लावून धरली.


