(जाकादेवी / वार्ताहर)
जिल्हा परिषद अंतर्गत हिवाळी क्रिडा स्पर्धेत तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धांमध्ये जि. प. आदर्श शाळा रानपाट मधील मोठ्या गटात कु. विराज हेमंत कुवार, कु. शिवानी प्रकाश गोनबरे आणि कु. आर्या रविंद्र गोनबरे तर लहान गटात कु. श्रावणी अनंत कळंबटे, कु. गिरिजा विकास मोरे आणि कु. अवनी दिनेश कळंबटे या विद्यार्थ्यांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन करून जिल्हा स्तरावर धडक मारली आहे.
केंद्र स्तरापासून तालुका स्तरापर्यंत अथक प्रयत्न करत या विद्यार्थ्यांनी आपली खेळी सिद्ध केली आणि म्हणूनच त्या त्या खेळातील तज्ज्ञ परीक्षकांच्या परिक्षणातून जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी या विद्यार्थ्यांची निवड केली. विराजने थाळी फेक आणि गोळा फेक या दोन्ही वैयक्तिक क्रिडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच सांघिक कबड्डी खेळातही अव्वल स्थान मिळविले आहे.
शिवानी गोनबरे हिने खो खो आणि कबड्डी या दोन्ही सांघिक खेळात उत्तम कामगिरी करून जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी आपण पात्र असल्याचे दाखवून दिले.आर्या रविंद्र गोनबरे हिने लंगडी खेळांमध्ये उत्तम प्रदर्शन करून खेळात आपली छाप पाडली.
लहान गटातील खो खो क्रिडा प्रकारात श्रावणी कळंबटे, अवनी कळंबटे आणि गिरिजा मोरे यांची जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी निवड झाली आहे.रानपाट मधील विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नेहमीच खेळात उत्तम कामगिरी केलेली आहे. पण जिल्हा स्तरावर येवढ्या मोठ्या प्रमाणात निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यासाठी मुख्याध्यापक श्री. सुहास भितळे, सहा. शिक्षक श्री. मनोज जाधव, पदवीधर शिक्षक श्री. अजय माने आणि सहा. शिक्षक श्री. प्रदीप पवार यांचे मार्गदर्शन लाभले. गावातील ग्रामस्थ आणि पालक यांचेही उत्तम सहकार्य मिळाले.
या सर्व स्पर्धकांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे. खालगाव प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ. सशाली मोहिते मॅडम, केंद्र प्रमुख श्री. राजीव दर्डी सर आणि बोंड्ये केंद्रातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. परिसरातील ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांकडून या विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

