(चिपळूण/ रत्नागिरी)
सलग दोन दिवस खोलीबाहेर न पडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. दरवाजा ठोठावून आणि हाका मारूनही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजावरील छिद्रातून डोकावून पाहिले असता ३८ वर्षीय तरुण अंथरुणावर निपचित पडलेला दिसला. ही घटना चिपळूण शहरातील बेदरकर आळी येथील औदुंबर सोसायटीमध्ये ११ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. फुरकान इकबाल अली कापडी (वय ३८) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याला कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, औदुंबर सोसायटीच्या ए विंगमधील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक २०३ मध्ये फुरकान कापडी राहत होता. तो सलग दोन दिवस खोलीबाहेर न पडल्याने त्याचे शेजारी आनंद रामकृष्ण बंदरकर यांना संशय आला. त्यांनी खोलीच्या दरवाजाची कडी वाजवून हाका मारल्या; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजावरील छिद्रातून आत डोकावून पाहिले. त्यावेळी फुरकान हा हॉलमध्ये अंथरुणावर विवस्त्र अवस्थेत निपचित पडलेला दिसून आला.
त्यानंतर फिर्यादी आणि पोलिसांच्या मदतीने त्याला तातडीने कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ६५/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.४५ वाजण्यापूर्वी ही घटना घडल्याचा अंदाज असून, मृत्यूची नेमकी वेळ समजू शकलेली नाही. या घटनेमुळे बेदरकर आळी परिसरात खळबळ उडाली आहे.


