कपडे विक्रीच्या निमित्ताने घराजवळ आलेल्या फेरीवाल्याने १३ वर्षीय मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार विक्रोळी परिसरात उघडकीस आला आहे. कपड्यांचे माप घेण्याच्या बहाण्याने मुलीला जवळ बोलावून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित व्यक्तीवर आहे. या घटनेनंतर महिनाभराने संशयित आरोपी पुन्हा परिसरात दिसताच स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून मारहाण केली आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. मोहम्मद अन्नास असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून विक्रोळी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ही घटना ऑक्टोबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यात घडली होती. परिसरात कपडे विक्रीसाठी फिरणाऱ्या आरोपीने मुलीला तिच्या घराजवळ गाठले. कपड्यांचे माप घेण्याचे कारण सांगून त्याने तिला जवळ बोलावले आणि तिच्याशी अश्लील स्पर्श केल्याचा आरोप आहे. यानंतरही आरोपी मुलीचा वारंवार पाठलाग करत असल्याचे समोर आले आहे. अखेर मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला.
दरम्यान, २४ नोव्हेंबर रोजी मुलीच्या आईला संबंधित संशयित व्यक्ती पुन्हा परिसरात दिसली. तिने त्याला ओळखल्यानंतर जाब विचारला. मात्र, पकडले जाण्याच्या भीतीने आरोपीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक नागरिकांनी त्याला अडवून पकडले आणि मारहाण केल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.
या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी मोहम्मद अन्नास याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारचा किंवा अन्य कोणता गुन्हा केला आहे का, याची पडताळणी पोलीस करत असून पुढील तपास सुरू आहे.


