(मुंबई / वृत्तसंस्था)
राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि सरकारी भरती प्रक्रियेतील पेपरफुटी तसेच अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार कायदा अधिक कठोर करण्याच्या तयारीत आहे. प्रश्नपत्रिका फोडणाऱ्यांना ७ ते १० वर्षांपर्यंत कारावास, किमान १० कोटी रुपयांचा दंड आणि दोषींशी संबंधित मालमत्ता जप्त करण्याची शिफारस सरकारने नियुक्त केलेल्या समितीने केली आहे. अशा प्रकरणांचा निकाल लवकर लागावा, यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
वरिष्ठ सनदी अधिकारी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्यातील भरती परीक्षा प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेऊन दुसरा अहवाल सरकारकडे सादर केला आहे. पेपरफुटीच्या घटनांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र विशेष तपास पथक (एसटीएफ) स्थापन करण्याची सूचना या अहवालात करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांची स्वतंत्र नोंदणी आणि माहिती उपलब्ध राहण्यासाठी ‘व्हेन्यू बँक’ तयार करणे, तसेच परीक्षा केंद्रांच्या व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्याची शिफारसही समितीने केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षार्थींना दिलासा देणाऱ्या काही महत्त्वपूर्ण शिफारशीही अहवालात समाविष्ट आहेत. एखादी परीक्षा रद्द झाल्यास उमेदवारांनी भरलेले संपूर्ण परीक्षा शुल्क परत करावे, अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेबाबत उमेदवाराने घेतलेला आक्षेप योग्य ठरल्यास त्यासाठी भरलेले शुल्कही परत देण्यात यावे, असे समितीने सुचवले आहे.
एमपीएससीच्या गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधील रिक्त पदांची संख्या वाढवून ती १६ हजारांपेक्षा अधिक करण्याचा प्रस्तावही अहवालात आहे. याशिवाय सर्व प्रकारच्या भरती परीक्षांसाठी उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची एकवेळ सवलत देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
एमपीएससी परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि त्याविरोधात उमेदवारांनी केलेली आंदोलने या पार्श्वभूमीवर ४ सप्टेंबर रोजी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आली होती. यापूर्वी समितीने अंतरिम अहवाल सादर करून परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सुरक्षितता आणण्यासाठी विविध उपाययोजना सुचवल्या होत्या.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समितीच्या दुसऱ्या अहवालातील शिफारशींची माहिती दिली. परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि पेपरफुटी रोखण्यासाठी कायद्यात कठोर तरतुदी करण्याबाबत समितीने महत्त्वपूर्ण सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.
“आगामी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा आणण्याचा आणि त्यासंबंधीचे विधेयक मंजूर करून घेण्याचा आमचा प्रयत्न असेल,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.


