(रत्नागिरी / वार्ताहर)
शहरात गस्त घालत असताना रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मुरुगवाडा परिसरात कारवाई करून गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूचा साठा जप्त केला. मुरुगवाडा येथील दांडा फिशरीजच्या मागील बाजूस असलेल्या वरचीवाडी येथे शुक्रवारी, १६ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या दारूसाठ्याची किंमत २८ हजार ७१२ रुपये असून, या प्रकरणी प्रशांत शिवराम नागवेकर (वय ६०, रा. मुरुगवाडा, भैरी मंदिराच्या मागे, रत्नागिरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गोवा बनावटीच्या विविध ब्रँडची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात ठेवल्याचा आरोप संशयितावर आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दारूसाठा जप्त केला असून, त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९५१ च्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मद्यसाठ्याबाबत पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव (भा.पो.से.), परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहायक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस हवालदार शांताराम झोरे, अमोल भोसले, भालचंद्र मयेकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांचा सहभाग होता.
शहर परिसरात नियमित गस्त सुरू असताना पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध मद्यसाठा बाळगणे आणि त्याच्या विक्रीविरोधातील पोलिसांच्या कार्यवाहीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.


