(रत्नागिरी /वार्ताहर)
झुडीओ कपड्यांची फ्रँचायझी मिळवून देण्याचे आश्वासन आणि मंत्रालयात सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल १ कोटी १० लाख १ हजार ८३ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार रत्नागिरीत समोर आला आहे. या प्रकरणी आकाश प्र. रसाळ (रा. रत्नागिरी) याच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी रॉबीन स्टीव्हन्स सोन्स (वय ४९, रा. मयुरेश अपार्टमेंट, जयस्तंभ, रत्नागिरी) यांना आरोपीने झुडीओ कपड्यांची फ्रँचायझी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी फिर्यादींकडून टप्प्याटप्प्याने १ कोटी १० लाख २२ हजार ५४ रुपये स्वीकारण्यात आले. मात्र, रक्कम घेऊनही फ्रँचायझी मिळवून देण्यात आली नाही. त्यानंतर फिर्यादींनी पैसे परत मागितले असता आरोपीने १२ लाख २० हजार ९७१ रुपये परत केले. उर्वरित ९८ लाख १ हजार ८३ रुपये अद्याप परत केले नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
फ्रँचायझीच्या आमिषाबरोबरच आरोपीने फिर्यादी यांच्या दोन मावस बहिणींना मंत्रालयात सरकारी नोकरी मिळवून देण्याचेही आश्वासन दिले. विधाता किशोर भोळे यांना मंत्रालयात डेप्युटी कलेक्टर पदावर नियुक्ती झाल्याचे बनावट पत्र देण्यात आले. तसेच पद्मश्री सचिन पेटकर आणि त्यांचे पती सचिन सुनील पेटकर यांना मंत्रालयातील बांधकाम विभागात लिपिक पदाच्या नोकरीसाठी मुलाखत असल्याचे खोटे पत्र दिले. या नोकरीच्या आमिषातून आरोपीने एकूण १५ लाख रुपये घेतले. बनावट कागदपत्रांचा प्रकार उघड झाल्यानंतर संबंधितांनी पैसे परत मागितले. त्यावेळी आरोपीने केवळ ३ लाख रुपये परत केले असून उर्वरित १२ लाख रुपये दिले नसल्याचा आरोप आहे.
फ्रँचायझीच्या व्यवहारातील थकित ९८ लाख १ हजार ८३ रुपये आणि सरकारी नोकरीच्या आमिषातून घेतलेले परंतु परत न केलेले १२ लाख रुपये, अशी एकूण १ कोटी १० लाख १ हजार ८३ रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. फ्रँचायझी देण्याचे आश्वासन आणि सरकारी नोकरीसाठी बनावट नियुक्तीपत्रे व मुलाखतीची पत्रे देऊन आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
तक्रारीनुसार, हा प्रकार १८ नोव्हेंबर २०२४ ते २१ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत गाडीतळ परिसरात घडला. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.१० वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(२), ३१८(४), ३३६(२), ३३६(३) आणि ३३७ प्रमाणे आकाश प्रकाश रसाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्रँचायझी आणि सरकारी नोकरीच्या नावाखाली झालेल्या या मोठ्या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.


