राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेला गती देण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने ३१ डिसेंबरपूर्वी पदोन्नतीचे आदेश जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या निर्णयात साहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) अर्थात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश नसल्याने गेल्या आठ ते दहा वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
पोलीस महासंचालक कार्यालयातील विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) यांनी यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक (PSI), साहाय्यक पोलीस निरीक्षक (API) आणि पोलीस निरीक्षक (PI) या संवर्गांतील अधिकाऱ्यांच्या प्रलंबित पदोन्नतीची प्रक्रिया ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव सादर करण्यास विलंब होत असल्याने वेळेत आदेश काढण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे महासंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल वेळेत पूर्ण न होणे, मालमत्ता विवरणपत्र निर्धारित मुदतीत सादर न करणे, भाषा परीक्षेतून सूट मिळाल्याची किंवा परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद सेवापुस्तकात नसणे, अशा प्रशासकीय त्रुटींमुळे पदोन्नतीची प्रक्रिया रखडत असल्याचे निर्देशांत नमूद करण्यात आले आहे. या अडचणी दूर करून प्रलंबित प्रस्तावांची कार्यवाही पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या आठ ते दहा वर्षांपासून साहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या अनेक अधिकाऱ्यांना अद्याप पदोन्नती मिळालेली नाही. या अधिकाऱ्यांनी पोलीस दलात २० ते ३० वर्षे सेवा बजावली असून, पदोन्नतीसाठी आवश्यक सेवाज्येष्ठता आणि अनुभवही त्यांच्याकडे आहे. तरीही त्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने पोलीस दलात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पूर्वी भारतीय पोलीस सेवेत (IPS) अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना टप्प्याटप्प्याने पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होत होत्या. मात्र, अलीकडच्या काळात आयपीएस अधिकाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे राज्य सेवेतील अधिकाऱ्यांसाठी पदोन्नतीच्या संधी मर्यादित झाल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत PSI, API आणि PI संवर्गातील पदोन्नतीसाठी मुदत निश्चित करण्यात आली असताना ACP अधिकाऱ्यांना या प्रक्रियेतून वगळण्यात आल्याने संबंधित अधिकाऱ्यांची नाराजी वाढली आहे.


