(सातारा / वृत्तसंस्था)
गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने टाटा नेक्सॉन कारमधून आलेल्या दोघांना सातारा ग्रामीण पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. शनिवारी सायंकाळी शेंद्रे गावच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी २५ किलो गांजा जप्त केला. गांजासह कार आणि दोन मोबाईल असा एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, साहिल तानाजी चंदनशिवे आणि वैभव रामलिंग गाडेकर या दोघांना अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक शनिवारी सायंकाळी गस्त घालत होते. यावेळी शेंद्रे गावच्या हद्दीत एका चारचाकी वाहनातून गांजा विक्रीसाठी दोन व्यक्ती येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे सातारा-शेंद्रे मार्गावरील डोंगरातील खाणीसमोर पोलिसांनी टाटा नेक्सॉन (क्र. एम. एच. 11 डी. एच. 9371) कार अडवली. वाहनातील दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. तसेच कारची तपासणी करण्यासही त्यांनी आडकाठी केली. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत वाहनाची झडती घेतली.
या तपासणीत कारमध्ये सुमारे सव्वा सहा लाख रुपये किमतीचा २५ किलो गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी गांजा, टाटा नेक्सॉन कार आणि दोन मोबाईल असा एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी साहिल तानाजी चंदनशिवे (रा. मांडवे, ता. खटाव, जि. सातारा) आणि वैभव रामलिंग गाडेकर (रा. उपळाई बुद्रुक, ता. माढा, जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे.


