(दापोली/ रत्नागिरी प्रतिनिधी)
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या वारीसाठी भक्तीभावाने निघालेल्या वारकऱ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या मद्यपी एसटी चालकावर अखेर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला आहे. दापोली आगाराच्या बसवरील चालकाने कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याने वारकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता आणि आळंदी येथे तब्बल सहा ते सात तास प्रवाशांचा नाहक खोळंबा झाला होता. या धक्कादायक प्रकारानंतर भारतीय जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेत एसटी प्रशासनाला धारेवर धरले होते. या दबावानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प.) रत्नागिरी विभागीय कार्यालयाने संबंधित चालकाचे निलंबन केले असले, तरी ‘मद्यपी चालकाच्या हाती प्रवाशांचे स्टिअरिंग सोपवलेच कसे?’ असा सवाल उपस्थित करत आगार प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे काढले जात आहेत.
दापोली एसटी आगारातून वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या विशेष गाडीवरील चालक तथा वाहक अंकुश बबन ठाणगे यांनी मद्यपान केले असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. सकाळी सात वाजल्यापासूनच चालक नशेत असल्याचा आरोप वारकऱ्यांनी केला. प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्याने आळंदी येथे बस थांबवावी लागली. परिणामी, विठ्ठल दर्शनाच्या ओढीने निघालेल्या वारकऱ्यांना तब्बल सहा ते सात तास ताटकळत बसावे लागले. अखेर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रभारी अधिकाऱ्यांनी पर्यायी चालकाची व्यवस्था केल्यानंतर गाड्या पुढील प्रवासासाठी रवाना झाल्या.
धार्मिक यात्रेसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या जिवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही, असा संताप व्यक्त करत भाजप पदाधिकाऱ्यांनी दापोली एसटी प्रशासनाला जाब विचारला होता. या प्रकरणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, तालुका सरचिटणीस संदीप केळकर, विवेक भावे, अजय कदम, सोशल मीडिया संयोजक बापू लिंगावळे, ओंकार जोशी, ओंकार वेल्हाळ, वीरू लिंगावळे, प्रमोद पांगारकर, मयुरेश वेल्हाळ आदी पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत कठोर कारवाईची मागणी लावून धरली होती.
विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांचे निलंबन आदेश
वाढता जनक्षोभ लक्षात घेऊन रत्नागिरी विभागीय कार्यालयाने १७ नोव्हेंबर २०२६ रोजी विभागीय आस्थापना आदेश (क्रमांक ३७०) जारी करत चालक अंकुश बबन ठाणगे यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले आहे. विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याच्या गंभीर गैरवर्तनाची नोंद करण्यात आली आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय दापोली आगार निश्चित करण्यात आले असून, पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
आगार प्रशासनाच्या तपासणी यंत्रणेचे काय?
या कारवाईमुळे एसटी प्रशासनाने आपली कातडी वाचवली असली, तरी मूळ प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या दापोली आगारात चालकांची ड्युटीपूर्वी ‘ब्रेथ अॅनालायझर’द्वारे तपासणी केली जाते की नाही? झोपेचे सोंग घेणाऱ्या आगार अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडला असून, केवळ चालकावर कारवाई न करता या बेजबाबदारपणाला जबाबदार असणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी, अशी देखील मागणी प्रवाशांमधून होत आहे.


