(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरातील विश्वनगर परिसरात नगरपालिकेच्या कर्मचारी वसाहतीसमोर राहणाऱ्या सुनील सुवरे यांच्या घराला गुरुवारी सायंकाळी देवघरातील दिव्यामुळे अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच या आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची मोठी धावपळ झाली. या दुर्घटनेत सुवरे कुटुंबाच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, सुमारे पावणेदोन लाख रुपयांची वित्तहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, स्थानिक तरुणांचे प्रसंगावधान आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
गुरुवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे देवघरात लावलेल्या दिव्याचा संपर्क जवळच्या साहित्याशी आल्याने आग भडकली. बघता बघता धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगरपालिकेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. संकटाची चाहूल लागताच परिसरातील स्थानिक तरुण प्रवीण वाघेला, घोसाळे, सूरज पवार, संकेत कांबळे, नरेश मोहिते आणि स्वरूप जाधव यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. या तरुणांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या खांद्याला खांदा लावून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्या या धाडसी आणि समयसूचक प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली आणि शेजारील घरांपर्यंत पसरण्याचा मोठा धोका टळला.
आपत्तीच्या या कठीण प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय (बारक्या) हळदणकर यांनी दाखवलेली संवेदनशीलता सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. आगीची माहिती समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून सुवरे कुटुंबाचे सांत्वन केले. केवळ शाब्दिक सहानुभूती न दाखवता, ऐन संकटात सापडलेल्या या कुटुंबाला तातडीने १० हजार रुपयांची रोख आर्थिक मदत देऊन त्यांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला. हळदणकर यांच्या या तात्काळ मदतीमुळे सुवरे कुटुंबाला मोठा मानसिक व आर्थिक आधार मिळाला असून, त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.


