( दापोली / वार्ताहर )
विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच एकाग्रता, संतुलन आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद केंद्रशाळा आसूद क्र. १ येथे ‘मिशन आपुलकी’ अंतर्गत लोकसहभागातून मोफत मल्लखांब प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला. शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी शाळेत आयोजित शारदोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
आसूद येथील त्रिवेणी संगम ग्रुपने पुढाकार घेत विद्यार्थ्यांसाठी मल्लखांब उपलब्ध करून दिला आहे. तसेच विद्यार्थ्यांना या पारंपरिक क्रीडाप्रकाराचे प्रशिक्षणही विनामूल्य दिले जाणार आहे. श्री निकेत बांद्रे आणि श्री आयुष जांभळे हे विद्यार्थ्यांना मल्लखांबाचे प्रशिक्षण देणार आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मल्लखांबातील विविध कौशल्ये शिकण्याची आणि शारीरिक क्षमतांचा विकास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
प्रशिक्षणाच्या शुभारंभप्रसंगी त्रिवेणी संगम ग्रुपचे अध्यक्ष श्री नंदकुमार बांद्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री ओंकार रेवाळे, श्री मोहन जांभळे, श्री कानसे गुरुजी, श्री दिलीप बांद्रे, श्री जयवंत बांद्रे, श्री नंदकुमार जोशी, सौ. कल्पना जोशी, मल्लखांब प्रशिक्षक श्री शिंदे आणि संगीत प्रशिक्षक श्री वरद दातार यांच्यासह ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मल्लखांब प्रशिक्षक श्री आयुष जांभळे यांनी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली. त्यातून उपस्थितांना या पारंपरिक क्रीडाप्रकाराची ओळख झाली. नियमित प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता, संतुलन आणि चपळता विकसित होण्यासोबतच त्यांच्यात आत्मविश्वास व एकाग्रता वाढण्यास मदत होणार आहे.
लोकसहभागातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री महेश गिम्हवणेकर, उपशिक्षक श्री सचिन जगताप, शिक्षिका सौ. पल्लवी खडके आणि पालकवर्गाने त्रिवेणी संगम ग्रुपचे आभार मानले. शाळा आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून सुरू झालेला हा उपक्रम विद्यार्थ्यांना पारंपरिक क्रीडाप्रकाराची गोडी लावण्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे.


