(मुंबई)
ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव या काँग्रेसचा ‘हात’ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी गटबाजीला कंटाळून हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रज्ञा सातव भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा असून, त्यांनी जर खरोखरच कमळ हाती घेतले तर हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून मात्र या चर्चेला दुजोरा देणारे संकेत मिळत असून, काँग्रेसमध्ये मात्र संभ्रमाचं वातावरण आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या चर्चेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसवर थेट हल्ला चढवत म्हटले की, त्या भाजपमध्ये येत असतील तर स्वागतच! काँग्रेसमध्ये प्रचंड विसंवाद आहे. त्यामुळे तिथले नेते आणि कार्यकर्ते हतबल झाले आहेत. प्रज्ञा सातव भाजपमध्ये येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे.
काँग्रेसचा पलटवार : ‘त्या पक्ष सोडणार नाहीत’
दुसरीकडे, काँग्रेस नेत्यांनी मात्र या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रज्ञा सातव भाजपमध्ये जाणार नसल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. “मी त्यांच्याशी संपर्कात आहे. मला वाटत नाही की त्या काँग्रेस सोडतील. कठीण काळात काँग्रेसने त्यांना आमदारकी दिली आहे,” असं पाटील यांनी सांगितलं.
- कोण आहेत प्रज्ञा सातव?
दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी - राहुल गांधींच्या निकटवर्तीय कुटुंबातील महत्त्वाचं नाव
- 2021 मध्ये राजीव सातव यांच्या निधनानंतर विधानपरिषदेवर वर्णी
- 2024 मध्ये पुन्हा काँग्रेसकडून विधानपरिषद आमदारकी
- 2021 पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा
कोण होते राजीव सातव?
राजीव सातव राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. 2014 च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. त्यामध्ये राजीव सातव यांचा समावेश होता. त्यामुळे राजीव सातव प्रचंड चर्चेत आले होते. त्यानंतर राजीव सातव यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या आणि पदे भूषवली होती.
मागील काही वर्षांत प्रज्ञा सातव यांच्यासोबत असलेले अनेक दिग्गज नेते व कार्यकर्ते काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत. अनेकांनी महायुतीत प्रवेश केल्यामुळे काँग्रेसची संघटनात्मक ताकद कमी होत असल्याचं चित्र आहे. अशातच, पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रज्ञा सातव भाजपमध्ये गेल्यास काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो.
प्रज्ञा सातव खरोखरच काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश करणार का, की ही केवळ राजकीय अफवा ठरणार? सातव यांच्या आजच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

