(चिपळूण /रत्नागिरी)
चिपळूण शहरातील भटक्या श्वानांचे वाढते हल्ले आणि मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार घडणाऱ्या हल्ल्यांमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना घराबाहेर पडतानाही भीती वाटत असल्याने संतप्त नागरिकांनी थेट चिपळूण नगरपालिकेवर धडक दिली. ‘शहरातील नागरिक महत्त्वाचे की श्वान?’ असा सवाल उपस्थित करत भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्याकडे करण्यात आली.
शहरातील विविध भागांतील नागरिक आणि महिलांनी नगराध्यक्षांची भेट घेऊन भटक्या श्वानांच्या वाढत्या उपद्रवाकडे लक्ष वेधले. सामाजिक कार्यकर्ते बापू काणे, डॉ. शमिना परकार, दादा खातू, कैसर देसाई, शिवाजी पेडणेकर यांच्यासह अनेक नागरिकांनी या समस्येची तीव्रता मांडली. श्वानांच्या हल्ल्यांत ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले जखमी होत असून, नागरिकांच्या दैनंदिन वावरावरही त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. श्वान चावल्यानंतर उपचारासाठी आवश्यक असलेल्या लसींच्या उपलब्धतेचा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला. खासगी डॉक्टरांकडे लस मिळत नसल्याने नागरिकांना कामथे येथे जावे लागते. तेथेही लस उपलब्ध न झाल्यास कराडपर्यंत धाव घ्यावी लागते. अशा परिस्थितीत श्वानांच्या हल्ल्यांमुळे जखमी झालेल्यांना उपचारासाठी मोठी धावपळ करावी लागत असल्याची व्यथा नागरिकांनी मांडली. विशेष म्हणजे, भटक्या श्वानांच्या नसबंदीसाठी पालिकेने सुमारे ३० लाख रुपये खर्च केल्याचा दावा करण्यात येत असतानाही शहरातील श्वानांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याकडे नागरिकांनी लक्ष वेधले. केवळ नसबंदी करून प्रश्न सुटणार नसून, नागरिकांवर हल्ले करणाऱ्या श्वानांच्या नियंत्रणासाठी पालिकेने ठोस आणि परिणामकारक उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
‘हल्ले करणाऱ्या श्वानांना श्वानप्रेमी घरी घेऊन जाणार आहेत का? मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये मोकाट श्वानांच्या प्रश्नावर उपाययोजना केल्या जातात, मग चिपळूणमध्येच हा प्रश्न का सुटत नाही?’ असे सवाल उपस्थित करत नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांच्या तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना निवेदने देऊनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
नागरिकांच्या तक्रारींना उत्तर देताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी भटक्या श्वानांची समस्या केवळ चिपळूणपुरती मर्यादित नसून अनेक शहरांमध्ये ती गंभीर बनल्याचे सांगितले. न्यायालयाच्या आदेशानुसार श्वानांची नसबंदी करण्याव्यतिरिक्त अन्य पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोकाट गुरांच्या प्रश्नावर दंडात्मक कारवाई सुरू असून, त्यांच्या व्यवस्थापनासाठी शेल्टर हाऊस उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात मोकाट श्वानांच्या गळ्यात पट्टा आणि काठी बांधण्याची उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले. मात्र, या उपाययोजनेतून नागरिकांना अपेक्षित सुरक्षितता मिळणार का, तसेच श्वानांच्या हल्ल्यांना प्रत्यक्षात कितपत आळा बसणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. त्यामुळे पालिकेच्या पुढील कार्यवाहीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. यावेळी सबा दळवी, अमिना दळवी, रूतूजा भैरवकर, यश ओतारी, कासम चौगुले, परवीन शाह, नंदू भालेकर, वैभव शिंदे, राजू जाधव, फैरोजा मोडक, अर्चना कारेकर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.


