(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर गोळवली टप्पा येथे भरधाव कंटेनरने पाठीमागून टाटा ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाले. या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, अपघातप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील गोळवली टप्पा येथे घडली. फिर्यादी सचिन प्रभाकर गोलतकर (वय ५२, रा. कुरणवाडी, पेठ किल्ला, रत्नागिरी) हे टाटा ट्रक (एमएच ०८ एपी ५८४०) घेऊन रत्नागिरीहून ठाण्याच्या दिशेने मुंबई-गोवा महामार्गावरून जात होते. यावेळी गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा चालक शिवकुमार नरेंद्र दुबे (वय ३६, रा. देवरिया, उत्तर प्रदेश) याने आपल्या ताब्यातील कंटेनर (एमएच ४६ सीयू ५५३९) भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवित ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याचा आरोप आहे.
या अपघातात ट्रकचालक सचिन गोलतकर आणि कंटेनरचालक शिवकुमार दुबे हे दोघेही जखमी झाले. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी सचिन गोलतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २८१, १२५ (अ) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.


