(संगमेश्वर / वार्ताहर)
मौजे गोळवली येथील धम्मचक्र बुद्धविहाराच्या नवीन वास्तूच्या उभारणीचा शुभारंभ रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात झाला. मौजे गोळवली बौद्धजन विकास मंडळाचे अध्यक्ष प्रेमदास गमरे यांच्या हस्ते नवीन वास्तूचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पूज्य भन्ते धम्मपाल यांनी बौद्ध परंपरेनुसार धार्मिक विधी संपन्न केले.
या सोहळ्याला मुंबई मंडळाचे अध्यक्ष विलास गमरे, सरचिटणीस महेंद्र गमरे, रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णा गमरे, सरचिटणीस रीना गमरे यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक आणि बौद्ध बांधव उपस्थित होते. तसेच चिखली दहा गाव संघटनेचे अध्यक्ष अरुण कदम, मुंबई संघटनेचे सरचिटणीस हरिश्चंद्र पवार, उदय मोहिते यांच्यासह मुंबई संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
अध्यक्षीय भाषणात प्रेमदास गमरे यांनी नवीन बुद्धविहाराची वास्तू ही समाजातील एकता, प्रबोधन आणि धम्मसंस्कारांना बळ देणारे महत्त्वपूर्ण केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. या वास्तूच्या उभारणीसाठी समाजातील प्रत्येकाने आर्थिक मदतीसह श्रमदानाच्या माध्यमातून योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक मंडळाचे सरचिटणीस महेंद्र गमरे आणि त्यांचे चिरंजीव अमोल गमरे यांनी एक लाख रुपयांची रोख देणगी दिली. याशिवाय कुंभारखणी येथील विजय गोविंद गमरे यांनी ५ हजार रुपये, तर धामणी येथील विकास कांबळे यांनी २ हजार ५०० रुपयांची देणगी जाहीर केली. या योगदानाबद्दल अध्यक्षांनी देणगीदारांचे विशेष आभार मानले.
मुंबई मंडळाचे अध्यक्ष विलास गमरे यांनीही समाजबांधवांना एकजुटीचे आवाहन केले. आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी संघटितपणे बुद्धविहाराच्या उभारणीसाठी पुढाकार घ्यावा. समाजाच्या सामूहिक सहकार्याने नवीन वास्तूचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भूमिपूजनानंतर बुद्धविहाराच्या बांधकामाला वेगाने सुरुवात करून एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत नवीन वास्तू पूर्ण करण्याचा मानस अध्यक्ष प्रेमदास गमरे यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष विकास गमरे आणि चिटणीस दिनेश गमरे यांनी केले. उत्साहपूर्ण वातावरणात हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. धम्मचक्र बुद्धविहाराची नवीन वास्तू आगामी काळात समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण केंद्र बनेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


