(रत्नागिरी / वार्ताहर)
एखादा अपघात संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकतो. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याची जिद्द, कुटुंबाची साथ आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास स्वावलंबनाकडे वाटचाल करता येते, याचा प्रत्यय खेड तालुक्यातील पॅराप्लेजिक दिव्यांग सुनील दत्ताराम खेतले यांच्या संघर्षमय जीवनप्रवासातून येतो. त्यांच्या दैनंदिन हालचाली अधिक सुलभ व्हाव्यात, यासाठी आरएचपी फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी त्यांना नवीन व्हीलचेअर भेट दिली. या भेटीमुळे सुनील यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.
सुनील दत्ताराम खेतले (वय ५०) हे केळणे, गुमलेवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी येथील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यांचे वडील दत्ताराम रामचंद्र खेतले सैन्यदलातून निवृत्त झाले होते. २०२२ मध्ये हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. आई सुलोचना गृहिणी आहेत. त्यांना एक भाऊ आणि दोन बहिणी असून सर्व विवाहित आहेत. भाऊ मुंबई येथे वॉचमन म्हणून नोकरी करतो.
दहावीनंतर सुनील मुंबईतील एका कपड्यांच्या दुकानात काम करत होते. २००८ मध्ये ते गावी परतले आणि चिपळूण येथील हमाल पंचायतच्या कार्यालयात काम करू लागले. २००३ मध्ये त्यांचा सोनल यांच्याशी विवाह झाला. सोनल या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना चार मुली आहेत. मोठी मुलगी दिया इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. दुसरी मुलगी भूमी बी.एस्सी.चे शिक्षण घेत असून तिसरी मुलगी आराध्या नववीत, तर चौथी मुलगी ईशा सातवीत शिकत आहे.
सुरळीत सुरू असलेल्या संसाराला २०१४ मध्ये एका भीषण अपघातामुळे मोठा धक्का बसला. नमनाचा कार्यक्रम करून घरी परतत असताना त्यांच्या गाडीला एका कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. परिणामी, कमरेखालील शरीराच्या संवेदना पूर्णपणे गेल्या.
अपघातानंतर त्यांना प्रथम कळंबणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारांसाठी डेरवण येथे पाठविण्यात आले. तपासणीनंतर पाठीच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांना मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास महिनाभर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतरही त्यांच्या शरीरातील संवेदना पूर्ववत झाल्या नाहीत. लघवी आणि शौचासंबंधीच्या संवेदनाही जाणवत नसल्याने त्यांच्या अडचणी अधिक वाढल्या.
महिनाभरानंतर ते घरी परतले; मात्र दैनंदिन जीवनातील प्रत्येक कामासाठी त्यांना पत्नी सोनल यांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत होते. वैयक्तिक स्वच्छतेसह दैनंदिन विधीही बेडवरच करावे लागत होते. एका संस्थेकडून त्यांना व्हीलचेअर मिळाली होती; परंतु त्यावर बसविण्यासाठी चार जणांची मदत घ्यावी लागत असे. त्यामुळे व्हीलचेअर उपलब्ध असूनही त्यांना स्वतःहून हालचाल करणे शक्य होत नव्हते.
अशा परिस्थितीत त्यांचे मित्र अक्षय आंबरे यांच्या माध्यमातून सुनील यांना आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांच्याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर नाकाडे यांनी स्वतः सुनील यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिस्थितीची आणि अडचणींची माहिती घेतली. त्यांना पुनर्वसन आणि फिजिओथेरपीची आवश्यकता असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी हाजीअली येथे जाऊन प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला.
या मार्गदर्शनानंतर सुनील आणि त्यांच्या पत्नी सोनल यांनी जवळपास चार महिने हाजीअली येथे राहून पुनर्वसनाचे प्रशिक्षण घेतले. व्हीलचेअरवरून बेडवर आणि बेडवरून पुन्हा व्हीलचेअरवर स्वतःच्या ताकदीने कसे जायचे, याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले. सातत्यपूर्ण सराव आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी स्वतःहून बेडवर जाणे-येणे शिकून घेतले. तसेच लघवीसाठी स्वतः सेल्फ-कॅथेटरायझेशन करण्याचेही प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडला. स्वतःची कामे स्वतः करण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला.
मात्र, प्रशिक्षण पूर्ण करून घरी परतल्यानंतर घराबाहेर जाण्यासाठी योग्य साधन उपलब्ध नसल्याने त्यांच्या हालचालींवर पुन्हा मर्यादा आल्या. कामासाठी बाहेर पडणेही शक्य होत नव्हते. दुसरीकडे, पत्नी सोनल या अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी करत असून त्यांच्या पगारावरच सध्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. चार मुलींचे शिक्षण आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना त्यांची मोठी धडपड सुरू आहे.
सुनील यांना यापूर्वी मिळालेली व्हीलचेअर कालांतराने पूर्णपणे खराब झाली होती. तिचा वापर करणेही अशक्य झाल्याने त्यांच्या दैनंदिन हालचालींमध्ये पुन्हा अडथळे निर्माण झाले होते. ही अडचण लक्षात घेऊन आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी संस्थेच्या वतीने त्यांना नवीन व्हीलचेअर भेट दिली.
नवीन व्हीलचेअर सुनील यांच्या शरीरयष्टीला योग्य प्रकारे अनुकूल असल्याने त्यांना ती वापरणे अधिक सोयीचे झाले आहे. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन हालचाली अधिक सुलभ होण्यास मदत मिळणार आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर स्वावलंबनाच्या दिशेने सुरू असलेल्या त्यांच्या प्रवासाला या मदतीमुळे नवी साथ मिळाली आहे. नवीन व्हीलचेअर मिळाल्याने सुनील यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सादिक नाकाडे यांचे मनापासून आभार मानले.
यावेळी आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे, सुनील खेतले, त्यांच्या पत्नी सोनल, मुली आराध्या व ईशा यांच्यासह शिवाजी कदम, नितीन घाडगे आणि शुभम ढेपसे उपस्थित होते.


