(दापोली / वार्ताहर)
सायकल संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासह नागरिकांमध्ये सायकल चालवण्याची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेली ‘दापोली विंटर सायक्लोथॉन २०२६’ (सिझन १०) ही स्पर्धा १५ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडली. या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सातारा यांसह राज्यातील विविध भागांतील १० ते ७५ वयोगटांतील १४० सायकलस्वारांनी सहभाग घेतला.
७५ वर्षीय ज्येष्ठ सायकलस्वार गजानन भाताडे (रत्नागिरी), अनेक सायकल मोहिमा पूर्ण केलेल्या कल्याणी तुळपुळे (पुणे) आणि सुनील रिसबूड (दापोली) यांच्या हस्ते झेंडा दाखवून सायक्लोथॉनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ५० किलोमीटर आणि ३० किलोमीटर अशा दोन गटांत कोस्टल सिनिक रूटवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राईड यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
दापोली, बुरोंडी, करजगाव, लाडघर, कर्दे, मुरुड, सालदुरे, पाळंदे, हर्णै आणि आसूद या समुद्रकिनारी भागांतून जाणाऱ्या निसर्गरम्य मार्गावरून सायकलस्वारांनी कोकणच्या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेतला. या प्रवासादरम्यान अनेक पर्यटनस्थळांना भेटी देत स्पर्धकांनी कोकणी खाद्यपदार्थ आणि मासळीचा आस्वाद घेतला. तसेच स्थानिक उत्पादनांची खरेदीही केली. विशेष म्हणजे, काही स्पर्धक आपल्या कुटुंबीयांसह दोन ते सात दिवसांच्या मुक्कामासाठी दापोलीत दाखल झाले होते. त्यामुळे या उपक्रमातून स्थानिक पर्यटनालाही चालना मिळाली.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुंबईतील जितेंद्र यादव, अनिल वेल्लमपती आणि अतुल ओझा यांनी मुंबई ते दापोली असा सायकल प्रवास केला. तर विद्याधर पालकर यांनी पुणे ते दापोली हे अंतर सायकलने पार केले. ७५ वर्षीय गजानन भाताडे (रत्नागिरी), ६४ वर्षीय अतुल ओझा (मुंबई), शरद कुलकर्णी (दौंड), अनिल धामणे (पुणे), विठोबा चव्हाण (मुंबई), नितीन बर्वे आणि सुनील खरात यांच्यासह ५८ ते ६० वयोगटांतील अनेक सायकलस्वारांनीही ही राईड यशस्वीरीत्या पूर्ण केली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, वाई येथील डॉ. अनिल शिंदे यांनी सिंगल गिअर सायकलवरून ही संपूर्ण राईड पूर्ण केली.
या सायक्लोथॉनमध्ये लहान सायकलस्वारांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मेघराज कळमकर (वय १०), अद्वैत जोशी, ग्रिष्मा चव्हाण, रिद्धिमा चव्हाण, शल्व हेदूकर, सम्यक जैन, श्रीराम शिंदे, स्वराज राजपूरकर, आयुष शिंदे आणि वरद कदम या बालसायकलस्वारांनीही राईड यशस्वीपणे पूर्ण केली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दापोली शिक्षण संस्था, दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज टीम, दापोली तालुका आरोग्य अधिकारी व त्यांची टीम, दापोली पोलीस टीम, मेनेकी न्यूट्रीशन टीम आणि राहुल मंडलिक यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले. सायक्लोथॉनच्या नियोजनात अंबरीश गुरव, प्रशांत पालवणकर, राजेशकुमार कदम, राजेंद्र नाचरे आणि सुनील रिसबूड यांच्यासह अनेकांनी मोलाची भूमिका बजावली. उत्स्फूर्त सहभाग आणि नियोजनबद्ध आयोजनामुळे दापोली विंटर सायक्लोथॉनचे दहावे पर्व यशस्वीरीत्या संपन्न झाले.


