(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सावर्डे आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून लहान-मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, चोरट्यांकडून प्रामुख्याने बंद घरांना लक्ष्य केले जात आहे. या घटनांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, अनेक चोरीच्या घटनांची पोलिस ठाण्यात रीतसर नोंद होत नसल्याचे समोर येत असल्याने प्रत्यक्षातील चोरीच्या घटनांची व्याप्ती किती मोठी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावर्डे परिसरातील दहिवली, खरवते, मांडके आणि सावर्डे या गावांमध्ये बंद असलेल्या घरांमध्ये चोरट्यांकडून हात साफ केला जात आहे. घरातील चांदीच्या वस्तू, देवघरातील पितळ व तांब्याच्या वस्तू, घडविलेले देव, देवांच्या चांदीच्या टाकांसह अन्य मौल्यवान वस्तू चोरीला जात आहेत. काही घरांमधून सुमारे ४० ते ५० हजार रुपयांपर्यंतच्या वस्तू चोरीला गेल्याची माहिती आहे.
चोरटे केवळ मौल्यवान वस्तूंची चोरी करून थांबत नसून, घरातील कुलूप, कपाटे आणि लॉकर तोडून मिळेल त्या वस्तूच्या शोधात मोठ्या प्रमाणावर नासधूसही करत आहेत. या परिसरातील अनेक कुटुंबे नोकरी आणि व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांची गावे आणि घरे बहुतांश वेळा बंद असतात. अशा घरांची आधी पाहणी करून, संधी मिळताच चोरटे चोरी करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दहा, वीस, तीस, चाळीस किंवा पन्नास हजार रुपयांच्या आसपासची चोरी झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया, पोलिस ठाण्यातील वारंवार फेऱ्या आणि इतर त्रास टाळण्यासाठी अनेक पीडित नागरिक तक्रार दाखल करण्यास पुढे येत नसल्याचे बोलले जात आहे. परिणामी, प्रत्यक्षात घडणाऱ्या चोरीच्या घटनांपैकी किती घटनांची अधिकृत नोंद होते, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
काही चोरी झालेल्या घरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही तपासाच्या दृष्टीने पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. चोरीच्या घटनांबाबत तक्रारी दाखल होत नसल्याने आणि तपासाबाबत अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याच्या भावनेमुळे चोरट्यांचे मनोधैर्य वाढत असल्याची चिंता ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
सावर्डे आणि परिसरातील ग्रामीण भागातील घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. पोलिस प्रशासनाने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन आतापर्यंत घडलेल्या चोरीच्या घटनांची माहिती संकलित करावी, त्यांचा योग्य तपास करावा आणि बंद घरांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच चोरीच्या घटनांमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांनी प्रोत्साहित करावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वरिष्ठ पोलिस प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून चोरट्यांचा बंदोबस्त करावा आणि सावर्डे परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.


