(संगमेश्वर /प्रतिनिधी)
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट परिसरात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाच्या ठिकाणाहून सुमारे चार लाख रुपये किमतीचा लोखंडी ब्रेकर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठेकदार आर.डी. सामंत कन्स्ट्रक्शन लिमिटेड, पाली (ता. जि. रत्नागिरी) यांच्यामार्फत आंबा घाटातील कळकदरा ते मार्लेश्वर (ता. संगमेश्वर) या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी कंपनीकडून पोकलँड मशीन व रोड रोलरच्या साहाय्याने खोदकाम, रस्त्याचे सपाटीकरण यांसह अन्य कामे केली जात आहेत. या कामाच्या ठिकाणी वापरण्यात येणारा दगड फोडण्यासाठीचा लोखंडी ब्रेकर अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय व स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या उद्देशाने चोरून नेला. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजण्यापूर्वी, निनावे गावातील एसटी बस पिकअप शेडजवळ ही चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
चोरीस गेलेल्या ब्रेकरची किंमत सुमारे ४ लाख रुपये असून, त्याचा इनव्हॉइस क्रमांक PMT/22-23/10791 असा आहे. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील कंत्राटदार दादाभाऊ रामदास वाकरे (वय ५६) यांनी देवरुख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.


