(राजापूर /रत्नागिरी प्रतिनिधी)
रिक्षाचे भाडे घेऊन घरातून बाहेर पडलेला २७ वर्षीय तरुण अद्याप घरी परतला नसल्याने बारसू परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शुभम रविंद्र शिर्के (वय २७, रा. बारसू, खालचीवाडी, ता. राजापूर) हा १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. मात्र, नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेऊनही तो आढळून न आल्याने त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी शुभम यांचे काका प्रभाकर सखाराम कदम (वय ६३, रा. बारसू, खालचीवाडी, ता. राजापूर) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, शुभम हा १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता रिक्षाचे भाडे घेऊन घरातून बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नाही. नातेवाइकांनी त्याचा परिसरात तसेच अन्य संभाव्य ठिकाणी शोध घेतला; परंतु तो कुठेही आढळून आला नाही. शुभम याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गुप्तपणे व गैरकायदेशीररीत्या डांबून ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण केले असावे, असा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. या तक्रारीवरून राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याचे आव्हान आता राजापूर पोलिसांसमोर आहे.
बारसूतील २७ वर्षीय शुभम शिर्के बेपत्ता होऊन कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. घरातून बाहेर पडलेला तरुण नेमका कुठे गेला? त्याचे अपहरण झाले असेल, तर त्यामागे कोणाचा हात आहे? सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन आणि संभाव्य मार्गांचा तपास करून पोलिस शुभमचा शोध कधी लावणार? केवळ गुन्हा दाखल करून तपासाची औपचारिकता पूर्ण होणार की शुभमला शोधण्यासाठी पोलिस यंत्रणा प्रत्यक्ष मैदानात उतरणार? आता राजापूर पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून बेपत्ता शुभम शिर्केचा तातडीने शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.


