(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी येथे आज पहाटे लक्झरी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टाईल्सने भरलेल्या ट्रकने ( RJ19 GJ 4786) वसईहून कणकवलीकडे जाणाऱ्या स्वामी समर्थ लक्झरी बसला (MH48DC 9439) मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दोन्ही वाहने पुलावर पलटी झाली. या दुर्घटनेत बसमधील २० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील वाहतूक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून सध्या या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेली रुग्णवाहिका सेवा आणि महाराष्ट्र शासनाची १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. या रुग्णवाहिकांच्या मदतीने जवळपास १२ गंभीर जखमी प्रवाशांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. या गंभीर जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ९ ते १० किरकोळ जखमींवर पाली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, अंजनारी येथील उतारावर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, अवघ्या दहा दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला होता. अंजनारी पुलावर वारंवार अपघात घडत असल्याने या ठिकाणी तातडीने आवश्यक सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.


