(मुंबई / वृत्तसंस्था)
लोकल ट्रेनमध्ये झालेल्या छेडछाडीला विरोध करून आरोपीला चप्पल मारल्याचा राग मनात धरत एका ५३ वर्षीय व्यक्तीने तरुणीला थेट रेल्वे रुळांवर ढकलल्याची धक्कादायक घटना मुंबईतील नायगाव रेल्वे स्थानकावर घडली आहे. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी घडलेल्या या घटनेत लोकलच्या चाकाखाली आल्याने तरुणीचा डावा हात कोपरापासून कापावा लागला. या प्रकरणी पोलिसांनी जितेंद्र हिरमुखे याला अटक केली आहे.
सदर तरूणीचे नाव सोफिया अस्लम खान असे असल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणी ४ नोव्हेंबर रोजी गर्दीमुळे विकलांग डब्यातून प्रवास करत होती. ती बोरिवलीहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढली होती. त्याच डब्यात जितेंद्र हिरमुखे हा प्रवास करत होता. तो नायगाव येथील पाझर तलाव, वाकी पाडा परिसरातील रहिवासी आहे. चार वर्षांच्या चिमुकल्या मुलाची आई असलेल्या सोफियाच्या आयुष्यात या घटनेमुळे मोठे संकट उभे राहिले आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, नायगाव स्थानकात लोकल आल्यानंतर आरोपीने तिचा विनयभंग केला. या प्रकाराला विरोध करत तरुणीने त्याला चप्पल मारली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. लोकल थांबलेली असतानाच आरोपीने तरुणीला प्लॅटफॉर्मवरून खाली रुळांच्या दिशेने ढकलले. रुळांवर पडल्यानंतर ती पुन्हा प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, त्याचवेळी लोकल सुरू झाल्याने तिचा डावा हात रेल्वेच्या चाकाखाली आला. या भीषण घटनेत तिचा हात कोपरापासून गमवावा लागला.
पीडित तरुणी सोफिया अस्लम खान हिने दिलेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबर रोजी ती आईला भेटण्यासाठी गोरेगाव येथे गेली होती. सायंकाळी बोरीवलीहून नायगावला परतत असताना लोकलमधील एका प्रवाशाने तिच्याशी गैरवर्तन करत चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. या छेडछाडीला तिने विरोध केला. नायगाव स्थानकात लोकलमधून उतरल्यानंतर तिने संबंधित प्रवाशाला जाब विचारला. त्यातून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. संतापलेल्या सोफियाने आरोपीला चप्पलने मारले. त्यानंतर आरोपीनेही तिला चप्पलने मारहाण करून जोरात धक्का दिला. त्यामुळे सोफिया लोकल आणि फलाट यांच्यामधील जागेतून थेट रेल्वे रुळांवर पडली. त्याचवेळी लोकल सुरू झाल्याने तिला स्वतःचा बचाव करता आला नाही आणि रेल्वेच्या चाकाखाली आल्याने तिचा हात कोपरापासून कापला गेला. सध्या तिच्यावर मुंबईतील कुपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी ६ नोव्हेंबर रोजी भाईंदर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ११७(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून जितेंद्र हिरमुखे याला ९ नोव्हेंबर रोजी अटक केली आहे.
या घटनेमुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणीने आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ‘मला न्याय हवा आहे. माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. माझं घर सांभाळणारी मी एकटी होते. माझा एक हात पूर्णपणे गेला आहे. एका हातानं मी काहीच करू शकत नाही. माझ्या डोक्यालाही मार लागला असून १६ टाके पडले आहेत. मी लवकर बरी व्हावी, यासाठी सर्वांनी प्रार्थना करा. त्या नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे,’ अशा शब्दांत तिने आपली व्यथा मांडली.
दरम्यान, या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) स्वतःहून गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (DGP) यांना पत्र पाठवून प्रकरणाचा निष्पक्षपणे आणि निश्चित कालमर्यादेत तपास करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने ‘एक्स’ (X) वरील पोस्टमधून याबाबत माहिती दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध करण्यात आलेल्या कायदेशीर कारवाईचा सविस्तर तपशील सादर करण्याबरोबरच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे सुरक्षित ठेवण्याचे निर्देशही आयोगाने दिले आहेत. पीडितेला सर्वसमावेशक वैद्यकीय उपचार, मानसिक आधार, दीर्घकालीन पुनर्वसन आणि योग्य नुकसानभरपाई उपलब्ध करून देण्याची मागणी आयोगाने केली आहे. याशिवाय, महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकल गाड्या आणि रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन ती अधिक मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणातील कारवाईचा सविस्तर अहवाल (Action Taken Report – ATR) सात दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाने दिले आहेत.


