(चिपळूण /रत्नागिरी)
घराजवळील झाडावरून पडून गंभीर जखमी झालेल्या ६० वर्षीय व्यक्तीचा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सुरेश सखाराम तांबट (वय ६०, रा. पिंपळी बुद्रुक, तांबटवाडी, ता. चिपळूण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश तांबट हे १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घराजवळील झाडावरून पडून जखमी झाले होते. त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची नोंद त्यावेळी राजारामपुरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ००/२०२६ अन्वये करण्यात आली होती. त्यासंदर्भातील कागदपत्रे टपालाद्वारे ११ नोव्हेंबर रोजी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात प्राप्त झाली. त्यानंतर आवक क्रमांक १७९९/२०२६ अन्वये कागदपत्रांची नोंद घेऊन आकस्मिक मृत्यू क्रमांक २४/२०२६ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.


