(चिपळूण /रत्नागिरी)
चिपळूण एसटी डेपो ते पॉवर हाऊस मार्गावर भरधाव दुचाकीने राँग साइडने येत एसटी बसला समोरून जोरदार धडक दिल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. या अपघातात एसटी बसमधील सहा प्रवासी जखमी झाले असून, दुचाकीस्वारासह त्याच्या पाठीमागे बसलेला एक इसमही किरकोळ जखमी झाला आहे. या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, दुचाकीचालक नित्यानंद विमल राणा (वय २३, रा. काळबादेवी, चेउलवाडी, मुंबई) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बसचालक विकास तुकाराम जाधव (वय ४०) हे ११ नोव्हेंबर रोजी सकाळी चिपळूण एसटी डेपो येथून टेरखच्या दिशेने बस (एमएच १४ बीटी २९९९) घेऊन निघाले होते. बसमध्ये त्यावेळी १० ते १२ प्रवासी होते. दुपारी ११.५५ वाजण्याच्या सुमारास पॉवर हाऊस परिसरात बस आली असता, पॉवर हाऊस नाक्याकडून चिंचनाका बाजारपेठेच्या दिशेने जाणाऱ्या यामाहा आर-१५ मोटारसायकलने (एमएच ०२ जीसी १३१३) रस्त्याची आपली बाजू सोडून राँग साइडने प्रवेश केला. भरधाव आणि निष्काळजीपणे आलेल्या या दुचाकीने एसटी बसच्या चालकाच्या बाजूच्या हेडलाईटजवळ समोरून जोरदार धडक दिली.
या अपघातात एसटी बसमधील सहा प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. तसेच दुचाकीस्वार नित्यानंद राणा आणि त्याच्या पाठीमागे बसलेला इसमही जखमी झाला. अचानक झालेल्या या धडकेमुळे दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी एसटी बसचालक विकास जाधव यांनी फिर्याद दिली असून, भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ) तसेच भा.दं.वि. कलम २७९, ३३७ अन्वये दुचाकीचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


