(चिपळूण / वार्ताहर)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या वतीने आयोजित ‘मयूरपंख २०२६’ या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवात कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले.
महोत्सवात महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. गायत्री चैतन्य मांगडे हिने नाट्य कला प्रकारातील एकपात्री अभिनय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने या स्पर्धेत तिसरे पारितोषिक मिळवत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
दापोली येथील कृषी महाविद्यालयात दि. १ ते ३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत तीन दिवसीय कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कलाप्रकारांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये गायत्री मांगडे हिने एकपात्री अभिनय सादर करत परीक्षकांची दाद मिळवली.
गायत्री मांगडे हिच्या या उल्लेखनीय यशासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम आणि उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
गायत्रीच्या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी तिचे अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


