(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रस्त्यावरील वाहतुकीचा अंदाज न घेता आणि येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची खातरजमा न करताच दुचाकीला अचानक उजवे वळण देणे तिघांच्या जिवावर बेतल्याची घटना तरवळ येथील पोचरी फाटा येथे घडली. दुचाकी आणि रिक्षाची धडक होऊन दुचाकीस्वारासह तिघे जखमी झाले. या अपघातप्रकरणी दुचाकीचालक विलास मधुकर कांबळे (वय ४८, रा. नारशिंगे, रत्नागिरी) याच्याविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विलास कांबळे हा ८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील मोटारसायकल (एमएच ०८ एडब्ल्यू १६०१) घेऊन नारशिंगे येथून जाकादेवी बाजारपेठेच्या दिशेने जात होता. तरवळ येथील पोचरी फाटा येथे आल्यानंतर त्याने रस्त्याची परिस्थिती आणि वाहतुकीचा अंदाज न घेता दुचाकी अविचाराने व बेदरकारपणे चालवली. गणपतीपुळे ते निवळी मार्गावरील येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची खातरजमा न करताच त्याने दुचाकीला अचानक उजवे वळण दिले. याचवेळी जाकादेवी बाजारपेठेच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाला (एमएच ०८ एक्यू २८६३) दुचाकीची जोरदार धडक बसली.
या अपघातात दुचाकीचालक विलास कांबळे याच्यासह दुचाकीवरील मिथुन अशोक कांबळे (वय ३४, रा. विल्ये) आणि रतन सुरेश रावणंग (वय ३७, रा. निवळी, वरची रावणंगवाडी) हे तिघे जखमी झाले. त्यांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार महेश पर्शुराम टेमकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार ११ नोव्हेंबर रोजी दुपारी २.४२ वाजता विलास कांबळे याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १२५ (अ), १२५ (ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


