(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरणारी कामगिरी करत वरची निवेंडी येथील कु. वृणाली नितीन पाटील ही विद्यार्थिनी आज, ११ नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील प्रतिष्ठित अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) येथील अभ्यास दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. जिल्हा परिषद रत्नागिरी आयोजित नासा-इस्रो परीक्षा २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय यश मिळवत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून नासा आणि इस्रो या दोन्ही अभ्यास दौऱ्यांसाठी पात्र ठरण्याचा बहुमान तिने मिळवला आहे. मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयात इयत्ता आठवीत शिकणाऱ्या वृणालीने यापूर्वी मे महिन्यात इस्रोचा (बेंगळुरू) अभ्यास दौरा यशस्वीरीत्या पूर्ण केला असून, आता १२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत ती अमेरिकेतील नासाला भेट देऊन अंतराळ संशोधनाचा अभ्यास करणार आहे.
रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी, तळेपाठ-नेवरेकरवाडी येथील एका सामान्य कुटुंबातून आलेल्या वृणालीने अल्पवयातच आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याजोगी कामगिरी केली आहे. लहानपणापासूनच अभ्यासातील कुशाग्र बुद्धिमत्ता आणि विविध क्षेत्रांतील गुणवत्तेच्या जोरावर तिने अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये आपली क्षमता सिद्ध केली. विशेष म्हणजे, तिची आवड केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरती मर्यादित नसून कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही तिने आपला ठसा उमटवला आहे. विविध मैदानी खेळांमध्येही तिने विशेष प्रावीण्य मिळवले आहे.
मे महिन्यात वृणालीची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्यानंतर वरची निवेंडी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी तिच्या यशाचे कौतुक करत आनंदोत्सव साजरा केला होता. आता इस्रोच्या यशस्वी दौऱ्यानंतर थेट अमेरिकेतील नासा येथे अभ्यासाची संधी मिळाल्याने तिच्या शैक्षणिक यशात आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला गेला आहे. या दुहेरी यशामुळे वरची निवेंडीसह मालगुंड आणि गणपतीपुळे परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आपल्या या यशामागे आई नेत्रा आणि वडील नितीन वसंत पाटील यांचे भक्कम पाठबळ, बळीराम परकर विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच ग्रामस्थांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन महत्त्वाचे ठरल्याचे वृणालीने कृतज्ञतापूर्वक नमूद केले आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनीने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर इस्रो आणि नासा या दोन्ही प्रतिष्ठित अंतराळ संशोधन संस्थांच्या अभ्यास दौऱ्यांसाठी पात्रता मिळवणे ही संपूर्ण कोकणासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. वृणालीच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती मेहनतीच्या जोरावर पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली आहे.


