(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गायवडी ते वरवडे तिवरी बंदर मार्गावर गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली. तसेच अनेक ठिकाणी महावितरणचे विद्युत खांब आणि विद्युत तारा रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. यावेळी या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना रस्ता जाण्या येण्यासाठी योग्य नसल्याने अन्य पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याचे सांगण्यात आले.
एकूणच या मुख्य मार्गावर वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्याने मोठी गैरसोय झाली होती. या रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने शुक्रवारी झाडे बाजूला करून वाहतूक व विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करण्याचे काम संबंधित खात्याकडून हाती घेण्यात आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. यासाठी वरवडे येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनी विशेष सहकार्य केल्याचे सांगण्यात आले आहे.