(संगमेश्वर / एजाज पटेल)
प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्याचा गाजावाजा केला जात असतानाच संगमेश्वर एसटी बसस्थानकातील डिजिटल माहिती फलकांचा कारभार मात्र पूर्णपणे विस्कळीत असल्याचे समोर आले आहे. बसचे वेळापत्रक, मार्ग, आगमन आणि प्रस्थानाची माहिती देण्यासाठी बसवण्यात आलेल्या दोन्ही स्क्रीनवर प्रवाशांना आवश्यक माहिती मिळत नसून व्यावसायिक जाहिरातींचाच भडिमार सुरू आहे. विशेष म्हणजे, एकाच स्थानकातील दोन स्क्रीनवर दोन वेगवेगळ्या वेळा आणि तीन दिवसांपूर्वीची तारीख दिसत असल्याने एसटी प्रशासनाच्या तांत्रिक व्यवस्थेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांच्या माहितीसाठी उभारलेल्या दोन्ही डिजिटल स्क्रीनवर जाहिरातींचे प्रसारण मोठ्या प्रमाणात सुरू असते. जाहिराती संपल्यानंतर बसच्या वेळापत्रकाचा तक्ता स्क्रीनवर झळकतो; मात्र त्यामध्ये बस क्रमांक, मार्ग, सेवा प्रकार, अंदाजित वेळ, निश्चित वेळ आणि गाडीची सद्यस्थिती यांसारख्या महत्त्वाच्या रकान्यांमध्ये कोणतीही माहिती दिसत नाही. त्यामुळे डिजिटल फलक असूनही प्रवाशांना बसच्या वेळा आणि मार्ग समजण्यासाठी पुन्हा चौकशी खिडकीवर जावे लागत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बसवलेल्या या फलकांचा प्रत्यक्ष उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डिजिटल फलकांवरील तांत्रिक गोंधळाचा आणखी एक प्रकार ५ नोव्हेंबर रोजी रात्री उघडकीस आला. टाइमस्टॅम्प कॅमेऱ्याच्या नोंदीनुसार रात्री ८ वाजून ३ मिनिटांनी टिपलेल्या छायाचित्रांमध्ये दोन्ही स्क्रीनवर ०२ नोव्हेंबर २०२६ ही तीन दिवसांपूर्वीची तारीख दिसत होती. त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे इंग्रजी भाषेतील स्क्रीनवर ०९:१२ अशी वेळ दाखवली जात होती, तर शेजारील मराठी स्क्रीनवर ०३:३९ अशी वेळ झळकत होती. प्रत्यक्षात रात्रीचे ८.०३ वाजलेले असताना एकाच स्थानकातील दोन डिजिटल फलकांवर दोन वेगवेगळ्या वेळा आणि चुकीची तारीख प्रदर्शित होत असल्याने या यंत्रणेच्या देखभालीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
एकाच ठिकाणी बसवलेल्या दोन स्क्रीनची तारीख आणि वेळही अचूक ठेवता येत नसेल, तर या यंत्रणेची देखभाल नेमकी कोणाकडे आहे? तीन दिवसांपूर्वीची तारीख आणि चुकीच्या वेळा प्रदर्शित होत असताना संबंधित अधिकाऱ्यांच्या ते निदर्शनास कसे आले नाही? या तांत्रिक त्रुटींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का, असे सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहेत.
जाहिरातींसाठी यंत्रणा कार्यरत, मग प्रवाशांच्या माहितीसाठी का नाही?
संगमेश्वर एसटी स्थानकात विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांची मोठी वर्दळ असते. अनेक प्रवासी बसच्या वेळा आणि मार्गांची माहिती मिळवण्यासाठी डिजिटल फलकांकडे पाहतात. मात्र, प्रत्यक्षात त्यांना रिकामे वेळापत्रक आणि मोठ्या आवाजातील व्यावसायिक जाहिरातींचाच सामना करावा लागत आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी उभारलेल्या स्क्रीनवर जाहिरातींचे प्रसारण व्यवस्थित सुरू असताना प्रवाशांना आवश्यक माहिती मात्र उपलब्ध होत नसल्याने या व्यवस्थेचा प्राधान्यक्रम नेमका कोणासाठी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जाहिरातींचे प्रसारण करण्यासाठी डिजिटल यंत्रणा कार्यरत ठेवली जात असेल, तर त्याच यंत्रणेवर बसच्या वेळापत्रकाची अचूक माहिती देणेही अपेक्षित आहे. जाहिरातींसाठी स्क्रीन सुरू असताना प्रवाशांच्या माहितीसाठी आवश्यक असलेली यंत्रणा मात्र निष्क्रिय का? जाहिरातींच्या मोठ्या आवाजामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेण्याची गरज
संगमेश्वर बसस्थानकातील डिजिटल फलकांवर बसच्या वेळापत्रकाचा अभाव, जाहिरातींचा मोठा आवाज, चुकीची तारीख आणि दोन स्क्रीनवरील विसंगत वेळा अशा अनेक त्रुटी एकाच वेळी समोर आल्या आहेत. त्यामुळे या प्रकाराकडे केवळ किरकोळ तांत्रिक बिघाड म्हणून पाहून चालणार नाही. एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थानकात भेट देऊन दोन्ही डिजिटल फलकांची तपासणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
डिजिटल फलकांमधील तांत्रिक दोष तातडीने दूर करून त्यावर बस क्रमांक, मार्ग, आगमन-प्रस्थानाच्या वेळा आणि गाडीची सद्यस्थिती यांची अचूक माहिती नियमितपणे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच स्क्रीनवरील तारीख व वेळ अद्ययावत ठेवण्याबरोबरच जाहिरातींच्या आवाजावरही नियंत्रण आणण्याची गरज आहे. या संपूर्ण व्यवस्थेची देखभाल कोणाकडे आहे आणि प्रवाशांना मूलभूत माहिती मिळत नसल्याबद्दल जबाबदार कोण, याचीही चौकशी होणे अपेक्षित आहे.
प्रवाशांच्या सुविधांच्या नावाखाली डिजिटल फलक उभारायचे, जाहिरातींचे प्रसारण मात्र जोरात सुरू ठेवायचे आणि बसच्या वेळापत्रकाबाबत प्रवाशांना वाऱ्यावर सोडायचे, हा प्रकार किती दिवस सुरू राहणार? संगमेश्वर एसटी स्थानकातील या डिजिटल व्यवस्थेचा प्रवाशांना प्रत्यक्ष लाभ मिळणार की ती केवळ जाहिराती दाखवण्यापुरतीच मर्यादित राहणार, याचे उत्तर आता एसटी प्रशासनाने द्यावे, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.


