(देवळे / प्रकाश चाळके)
काजू प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासोबतच काजू बी उत्पादक शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे रत्नागिरी येथील दळवी कॅशुचे मालक श्री. संदेश परशुराम दळवी यांना महाराष्ट्र शासनाच्या ‘खादी ग्रामोद्योग उद्योग भरारी पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईतील राजभवन येथे नुकत्याच आयोजित समारंभात राज्याचे राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची विशेष उपस्थिती होती. सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ग्रामीण भागातील महिला आणि शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दळवी यांनी केलेल्या कार्याचे राज्यपालांनी विशेष कौतुक केले.
ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या कष्टातून उत्पन्न मिळवता यावे आणि कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत त्यांना हातभार लावता यावा, या उदात्त उद्देशाने संदेश दळवी यांनी २०१० साली संगमेश्वर तालुक्यातील घोडवली गावात काजूगर प्रक्रिया उद्योगाची सुरुवात केली. या व्यावसायिक प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नी सौ. श्रद्धा दळवी यांची मोलाची साथ लाभली.
सुरुवातीला अवघ्या पाच महिलांच्या सहभागातून श्री. संदेश दळवी आणि सौ. श्रद्धा संदेश दळवी यांनी छोट्या स्वरूपात काजू प्रक्रिया व्यवसायाला सुरुवात केली. मात्र, जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर या उद्योगाचा विस्तार झाला. आज या उद्योगाच्या माध्यमातून ११५ महिलांना प्रत्यक्ष, तर सुमारे १२०० काजू बी उत्पादक शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे.
काजूगर निर्मितीच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी देतानाच स्थानिक काजू उत्पादक शेतकऱ्यांनाही आधार देण्याचे महत्त्वपूर्ण काम दळवी यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची राज्य शासनाने दखल घेत त्यांना खादी ग्रामोद्योग उद्योग भरारी पुरस्काराने गौरविले आहे.
संदेश दळवी यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील काजू प्रक्रिया उद्योगातील उद्योजकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.


