(संगमेश्वर / एजाज पटेल)
करजुवे येथे कार्यक्रमासाठी जाऊन घरी परतणाऱ्या कोंडये येथील ६६ वर्षीय वृद्धाचा प्रवासादरम्यान अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १ नोव्हेंबर २०२६ रोजी घडली. रस्त्याच्या बाजूला नैसर्गिक विधीसाठी गेले असताना अचानक साप दिसल्याने ते घाबरून ओरडले. या प्रसंगानंतर काही अंतरावर गाडीतच त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि ते कोसळले. विश्राम गणपत बारगुडे (वय ६६, रा. कोंडये मधलीवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्राम बारगुडे हे १ नोव्हेंबर २०२६ रोजी राजाराम देवकड यांच्या गाडीतून एका कार्यक्रमासाठी करजुवे येथे गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते पुन्हा कोंडयेच्या दिशेने परतत होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे संदिप गोपाल बारगुडेही होते. प्रवास सुरू असताना गाडी दुर्गावलेवाडी परिसरात आली असता विश्राम बारगुडे यांनी नैसर्गिक विधीसाठी गाडी थांबवण्यास सांगितले.
गाडी थांबल्यानंतर ते खाली उतरून रस्त्याच्या कडेला गेले. त्याचवेळी अचानक समोर साप दिसल्याने ते प्रचंड घाबरले आणि मोठ्याने ‘साप, साप’ असे ओरडू लागले. त्यांचा आवाज ऐकताच पुतणे संदिप राजाराम देवकड यांनी तातडीने गाडीतून उतरून घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत साप तेथून निघून गेला होता.
काही वेळाने परिस्थिती सामान्य झाल्यानंतर तिघेही पुन्हा गाडीत बसून कोंडयेच्या दिशेने निघाले. मात्र, घटनास्थळापासून काही अंतर पुढे गेल्यानंतर विश्राम बारगुडे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर ते गाडीत बसलेल्या जागीच कोसळले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सोबत असलेले नातेवाईक घाबरून गेले.
पुतणे संदिप बारगुडे यांनी वेळ न दवडता त्यांना तातडीने फुणगुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तेथील आरोग्य केंद्र बंद असल्याने त्यांना तात्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात रात्रीच्या सुमारास मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेची माहिती मृताचे पुतणे संदिप गोपाल बारगुडे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अरुण. बी. वानरे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
कार्यक्रमासाठी आनंदाने घराबाहेर पडलेल्या विश्राम बारगुडे यांचा परतीच्या प्रवासात अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने कोंडये मधलीवाडीसह परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने ग्रामस्थ आणि नातेवाईकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.


