(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
रत्नागिरीत प्रथमच ‘बुद्धिस्ट गोल्डमॅन’ म्हणून जगामध्ये ओळखले जाणारे रोहित पिसाळ यांचे आगमन झाले. त्यांच्या उपस्थितीने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आणि तरुणाईत उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पिसाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. हा कार्यक्रम रविवारी, २१ सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हॉल येथे पार पडला. यावेळी अनंत सावंत, एल वी पवार, अमोल जाधव, वीरश्री बेटकर मॅडम आदी उपस्थित होते.
मुंबईत निर्माण होत असलेल्या ‘नमो तस्स हेलिपॅड’ प्रकल्पाबाबत पिसाळ यांनी माहिती देत, काही दिवसांत हा महत्त्वाचा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. याचबरोबर रत्नागिरीतील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरीमध्ये बुद्धिस्ट अर्बन बँकेची शाखा सुरू करण्यासाठी स्वतःचा विशेष प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. तरुणांना व्यावसायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करताना पिसाळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धांवरील त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणात अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. त्यांच्या मांडणीदरम्यान आंबेडकरी नव्या साहित्यिकाची झलकही प्रकट झाली. काव्य आणि लेखनाची आवड असलेल्या पिसाळ यांनी अनेक कविता आणि लेखही लिहिले आहेत.
बुद्धिस्ट गोल्डमॅन रोहित पिसाळ हे केवळ बुद्धिस्ट गोल्डमॅन नव्हे तर आंबेडकर चळवळीचे अभ्यासक म्हणूनही ओळखले जातात. विविध देशांचा दौरा करताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागतिक स्तरावर ठसा उमटविला आहे. या दौऱ्यांमध्ये पिसाळ यांच्याकडून अनेकदा एक वाक्य ठळकपणे ऐकायला मिळत असते. “बाबासाहेब आपले बाप आहेत.” आंबेडकरी समाजाच्या अस्मितेशी जोडलेला हा भावनिक उच्चार त्यांच्या प्रत्येक भाषणात दिसून येतो. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमधून आंबेडकरांच्या विचारांचा गाभा आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुकुंद सावंत, लवेश कांबळे, अमोल सावंत, राजेंद्र कांबळे, प्रितेश कांबळे, अजित मोहिते, प्रकाश पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यक्रमांचे सूत्रसंचालन अमोल बेटकर यांनी केले.
बुद्धिस्ट गोल्डमॅन एन्ट्री होताच फॅन्सची फोटोसेशनसाठी गर्दी
‘बुद्धिस्ट गोल्डमॅन’ रोहित पिसाळ यांच्या एन्ट्रीसोबतच कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सुवर्णालंकारांसह आपल्या आधुनिक वेशभूषेत ते सभागृहात दाखल होताच चाहत्यांनी त्यांना घेरले. तरुण-तरुणींसह विविध कार्यकर्त्यांनी फोटोसेशनसाठी अक्षरशः रांगा लावल्या. मोबाइल कॅमेऱ्यांचा फ्लॅश सतत चमकत राहिला. पिसाळ यांनीही चाहत्यांना हसतमुखाने वेळ देत, प्रत्येकासोबत फोटो काढून दिल्याने गर्दीत आणखी उत्साह वाढला. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे त्यांच्या लोकप्रियतेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.
थिबा कालीन बुद्ध मूर्ती परिसराला भेट; पिसाळ यांची भूमिका स्पष्ट
रत्नागिरी दौऱ्यावर असताना ‘बुद्धिस्ट गोल्डमॅन’ रोहित पिसाळ यांनी थिबा पॅलेस परिसरातील थिबा कालीन बुद्ध मूर्तीला भेट दिली. या ऐतिहासिक मूर्तीविषयी त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पिसाळ म्हणाले की, संघर्ष समितीच्या लढ्यात मीही ताकदीने उभा आहे. स्थानिक प्रश्न आणि वारसा संवर्धनासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने एकदिलाने प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. थिबा राजाचा वास्तू हा रत्नागिरीचा ऐतिहासिक ठेवा असून त्याचे जतन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले.
….हे पाहून मनापासून दुःख झाले
यावेळी थिबा राजाच्या ऐतिहासिक राजवाड्याला भेट दिली. पॅलेस परिसराची पाहणी करताना त्यांनी तेथील प्रदर्शनास ठेवलेल्या खुर्च्या, पलंग आणि थिबा राजाच्या काळातील विविध वस्तू प्रत्यक्ष पाहिल्या. या भेटीदरम्यान तिथे प्रदर्शनासाठी ठेवलेल्या शिवलिंगासह काही वस्तूंवर पिसाळ यांनी विशेष लक्ष वेधले. याबाबत थेट प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “रत्नागिरीकर हे सहन करत असतील, पण मला मात्र हे पाहून मनापासून दुःख झाले.” वारसा जतनाच्या नावाखाली कोणत्याही धार्मिक भावनांना धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

