(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी आणि अवैध साठ्यांविरोधात जिल्हा पोलीस दलाने कारवाई तीव्र केली आहे. गेल्या वर्षभरात अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत ६४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ९२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवायांमध्ये ब्राऊन हेरॉईन, हायड्रोपोनिक गांजा आणि एमडी या अंमली पदार्थांसह एकूण १४ लाख २८ हजार ६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नार्को को-ऑर्डिनेशन यंत्रणेच्या (एनकॉर्ड) जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
एमआयडीसीतील कंपन्यांची संयुक्त तपासणी करण्याचे निर्देश
अंमली पदार्थांचे उच्चाटन करणे हा केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचे सांगत बी. बी. महामुनी यांनी जिल्ह्यातील कारवाईला अधिक गती देण्याचे निर्देश दिले. गेल्या वर्षभरातील कारवाई समाधानकारक असली, तरी या मोहिमेची तीव्रता आणखी वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एमआयडीसी परिसरातील संशयास्पद हालचालींना आळा घालण्यासाठी पोलीस विभाग आणि एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवावी. या मोहिमेअंतर्गत कंपन्यांची कसून तपासणी करण्याबरोबरच बंद कारखान्यांचीही तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
सागरी सुरक्षेसाठी मासेमारी बोटींची नियमित तपासणी
रत्नागिरी जिल्ह्याच्या विस्तीर्ण सागरी किनारपट्टीचा अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी गैरवापर होऊ नये, यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने विशेष दक्षता घेण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. जिल्ह्यातील सर्व मासेमारी बोटींची नियमित तपासणी करण्यावर भर देण्यात आला. तसेच बोटींवर काम करणाऱ्या नेपाळी आणि अन्य परप्रांतीय कामगारांची पार्श्वभूमी तपासून त्यांची सखोल पडताळणी करावी, असे निर्देश अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिले.
अंमली पदार्थ आणि सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती वाढवा
रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस दलाकडून ग्रामसभांच्या माध्यमातून अंमली पदार्थविरोधी उपाययोजना आणि सायबर गुन्हेगारीविरोधात प्रभावी जनजागृती करण्यात आली आहे. या मोहिमेत शिक्षण विभागानेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आता सर्व शासकीय विभागांनी अंमली पदार्थांविरोधातील लढा ही आपली सामूहिक जबाबदारी मानून मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.


