(ठाणे / वृत्तसंस्था)
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाला एक महिना उलटूनही मुख्य सूत्रधाराला अटक का करण्यात आलेली नाही, असा सवाल शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मीनाक्षी शिंदे यांना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. या प्रकरणातील पुरावे उपलब्ध असूनही कारवाई केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. प्रकरणाचा तपास वेगाने करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी आदित्य ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे आरोप केले.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यात संतापाची लाट उसळली होती. त्यांच्या हत्येला न्याय मिळावा, या मागणीसाठी मुलगा राम पूर्णेकर हा एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गेला असता पोलिसांनी रामलाच अटक केल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हत्येप्रकरणी माहिती घेतली असली, तरी पोलिसांकडून अपेक्षित प्रयत्न होत नसल्याचा दावा त्यांनी केला. पूर्णेकर कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या व्हिडीओवरही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिल्यानंतरही त्यांच्यावर पुढील कारवाई कधी होणार, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. ठाणेकरांच्या दबावामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागल्याचे सांगत त्यांनी अटकेबाबत पोलिसांना जाब विचारला. न्यायासाठी आवाज उठवला जात असताना ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांची भाषा काय आहे, असा प्रश्न उपस्थित करून आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावरही टीका केली. मीनाक्षी शिंदे यांना वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर का केला जात आहे का? याचे उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ठाण्याची परिस्थिती बीडपेक्षाही वाईट झाल्याचा आरोप करत त्यांनी प्रदीप पूर्णेकर यांची हत्या राजकीय असल्याचे म्हटले. ही हत्या मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी घडवून आणल्याचा आरोपही राऊत यांनी केला. महाराष्ट्राने इतका दुर्बल मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यापूर्वी कधी पाहिला नव्हता, अशी टीका त्यांनी केली.
या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण आहे, याची माहिती पोलीस आयुक्तांना स्वतः असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. मात्र, पोलिसांचे हात बांधलेले असल्याचा आरोप करत पुरावे शोधण्यात पोलीस अपयशी ठरत असतील, तर पोलीस खाते बरखास्त करा, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पूर्णेकर कुटुंबीय आणि ठाकरे गटाकडून सातत्याने आरोप होत असलेल्या मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या नेतृत्वाची बदनामी टाळण्यासाठी आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपला संबंध नसलेल्या काही प्रकरणांमध्ये आपले नाव जोडून पक्ष नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी राजीनाम्याच्या पत्रातून केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


