(गणपतीपुळे /वैभव पवार)
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांच्या बचावासाठी आता आधुनिक रोबोटिक वॉटर क्राफ्टची मदत घेतली जाणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जयगड पोलीस ठाण्याने हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या यंत्राच्या साहाय्याने समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बुधवारी, २८ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर प्रात्यक्षिक सराव घेण्यात आला. पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हा सराव पार पडला.
रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जयगड पोलीस ठाण्याला दोन रोबोटिक वॉटर क्राफ्ट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर दोन, तर दापोली, गुहागर आणि आरे-वारे या समुद्रकिनाऱ्यांवर प्रत्येकी एक रोबोटिक वॉटर क्राफ्ट देण्यात आले आहे.
गणपतीपुळे येथे दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. समुद्रकिनाऱ्याचे आकर्षण असल्याने समुद्रस्नानासाठीही पर्यटकांची गर्दी होते. मात्र, खोल समुद्रात जाऊन स्नान करताना अनेकदा पर्यटकांना पाण्याच्या प्रवाहाचा आणि लाटांचा सामना करणे कठीण होते. अशा वेळी बुडण्याचा धोका निर्माण झाल्यास स्थानिक व्यावसायिक, जीवरक्षक, होमगार्ड आणि पोलीस कर्मचारी तातडीने मदतीसाठी धाव घेतात. अनेक प्रसंगी या यंत्रणांनी माणुसकीच्या भावनेतून बुडणाऱ्या पर्यटकांचे प्राण वाचविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
समुद्रकिनाऱ्यावर दुर्घटना घडल्यास बचावकार्य अधिक जलद आणि प्रभावीपणे करता यावे, या उद्देशाने रोबोटिक वॉटर क्राफ्टचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी जयगड पोलीस ठाण्याकडून पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांना प्रशिक्षित करण्यात आले असून, संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून त्यांना या आधुनिक उपकरणाच्या वापराबाबत विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
रोबोटिक वॉटर क्राफ्ट समुद्रात २०० मीटर अंतरापर्यंत सहज पोहोचू शकते. समुद्रात उसळणाऱ्या मोठ्या लाटांचा सामना करत खोल पाण्यात बुडणाऱ्या पर्यटकांपर्यंत पोहोचून त्यांना बाहेर आणण्यास या यंत्राची मदत होऊ शकते. विशेषतः पावसाळ्यात समुद्र खवळलेला असताना आणि परिस्थिती धोकादायक बनल्यास बचावकार्यासाठी हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे.
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर गेल्या काही वर्षांत समुद्रात बुडून पर्यटकांचा मृत्यू होण्याच्या अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये स्थानिक व्यावसायिक, जीवरक्षक, होमगार्ड आणि पोलीस यंत्रणेने अनेक पर्यटकांना मृत्यूच्या दाढेतून वाचविले आहे. आता या बचाव यंत्रणांच्या मदतीला आधुनिक रोबोटिक वॉटर क्राफ्ट उपलब्ध झाल्याने समुद्रकिनाऱ्यावरील दुर्घटनांवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक व्यावसायिक, ग्रामस्थ आणि पर्यटकांकडून व्यक्त होत आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल : पोलीस निरीक्षक संजय पाटील
रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रोबोटिक वॉटर क्राफ्टसारखे आधुनिक उपकरण उपलब्ध झाले आहे. समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी आणि अशा दुर्घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी होमगार्ड आणि पोलीस कर्मचारी रोबोटिक वॉटर क्राफ्टच्या मदतीने आपली जबाबदारी चोख बजावतील, असा विश्वासही पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी व्यक्त केला.


