(राजापूर / तुषार पाचलकर)
स्मार्ट ग्रामपंचायत पाचलच्या वतीने १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग तसेच गरजू नागरिकांसाठी विविध आवश्यक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज पाचल ग्रामपंचायत इमारतीतील सभागृहात उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील ३०० हून अधिक दिव्यांग आणि गरजू नागरिकांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार किरण उर्फ भैया सामंत, पाचलचे सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, राजापूर पंचायत समितीच्या सभापती नंदिनी कदम, पंचायत समिती सदस्या अपेक्षा मासये, समीक्षा वाफेलकर, प्रसाद मोहोरकर, राजू कुरूप, करकचे सरपंच सुरेश ऐनारकर, पांगरीचे सरपंच अमर जाधव, पाचलचे माजी सरपंच अशोक सक्रे, पाचल तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनायक खानविलकर तसेच प्रभाग संघाच्या अध्यक्ष विनया पवार यांच्यासह ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी राजापूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बजावलेल्या उल्लेखनीय भूमिकेबद्दल राजापूर तालुका पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा पाचल ग्रामपंचायतीच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार किरण उर्फ भैया सामंत म्हणाले की, राजापूर शहरानंतर पाचल ही तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेली ग्रामपंचायत आहे. त्यामुळे पाचलसाठी आवश्यक नागरी सुविधा आणि विकासकामांसाठी विशेष निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. यापूर्वीही आपल्या माध्यमातून ग्रामपंचायतीला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, भविष्यातही विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दिव्यांग आणि गरजू नागरिकांसाठी साहित्य वाटपाचा हा उपक्रम आपल्या हस्ते पार पडत असल्याचा आनंद असून, हा कार्यक्रम आपल्या हस्ते होत आहे हे आपले भाग्य असल्याची भावना सामंत यांनी व्यक्त केली. तसेच सरपंच बाबालाल फरास आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे त्यांनी कौतुक केले.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिव्यांग आणि गरजू नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार मदत मिळावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. ग्रामपंचायतीच्या अशा सामाजिक उपक्रमांमुळे गरजू नागरिकांना प्रत्यक्ष मदत मिळण्याबरोबरच त्यांना आधार आणि आत्मविश्वासही मिळत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच बाबालाल फरास यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सिद्धार्थ जाधव यांनी केले.

