(राजापूर / रत्नागिरी प्रतिनिधी)
राजापूर एसटी आगार परिसरात भजनाचा कार्यक्रम संपल्यानंतर घरी जाण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीची दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. सुभाष दशरथ कुर्ले (वय ५८, रा. तेलीवाडी, कोड्ये, ता. राजापूर) यांची हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची फिर्याद राजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. चोरीला गेलेल्या दुचाकीची किंमत २० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १.५० वाजण्याच्या सुमारास भजनाच्या कार्यक्रमातील गजर संपल्यानंतर कुर्ले हे घरी जाण्यासाठी आपल्या दुचाकीजवळ गेले. मात्र, त्या ठिकाणी त्यांची दुचाकी दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी मित्र जगदीश गरव आणि अन्य मित्रांच्या मदतीने राजापूर एसटी आगार परिसर, कोदवली पेट्रोलपंप, जवाहर चौक तसेच राजापूर बाजारपेठेत दुचाकीचा शोध घेतला. मात्र, बराच शोध घेऊनही दुचाकी मिळून आली नाही.
अखेर अज्ञात व्यक्तीने संमतीशिवाय लबाडीच्या उद्देशाने दुचाकी चोरून नेल्याचा संशय व्यक्त करीत कुर्ले यांनी पोलिसांत धाव घेतली. चोरीस गेलेली दुचाकी हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची असून, तिचा क्रमांक एमएच ०८ एए ९४०१ आहे. काळ्या रंगाच्या या दुचाकीच्या बाजूला निळ्या आणि लाल रंगाचे पट्टे आहेत.
या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


