(रत्नागिरी / प्रतिनिधी)
चिपळूण तालुक्यातील तुरुंबव येथील श्री शारदादेवी मंदिर रामवाडी ते अबिटगाव या जोडरस्त्याच्या सुधारणेसह डांबरीकरणासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. मात्र, निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने प्रत्यक्ष कामाला मुहूर्त कधी लागणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या दिरंगाईबाबत जिल्हा परिषद सदस्या तथा स्थायी समिती सदस्या शिवानी संदीप सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
तुरुंबव येथील श्री शारदादेवी मंदिरात यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत आहे. अशा वेळी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे प्रवासातील अडथळे ठरत असून, भाविकांसह स्थानिक नागरिकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या सुधारणेसाठी निधी उपलब्ध असतानाही कामाची प्रक्रिया पुढे सरकत नसल्याने सावंत यांनी नाराजी व्यक्त केली. रस्त्याच्या सुधारणेसह डांबरीकरणाचे काम प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता लक्षात घेता, तोपर्यंत भाविकांना खड्ड्यांतून मार्ग काढण्याची वेळ येऊ नये, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होईपर्यंत संबंधित विभागाने रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत आणि प्रवास सुरक्षित व सुकर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी अधीक्षक अभियंत्यांकडे केली.
निधी मंजूर आणि प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतरही निविदा प्रक्रिया रखडण्यामागील कारणांचा शोध घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी, तसेच झालेल्या दिरंगाईची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. यात्रेच्या काळात भाविकांची सुरक्षितता आणि नागरिकांची गैरसोय हा प्राधान्याचा विषय असायला हवा. त्यामुळे मंजूर निधीचा विनियोग वेळेत होऊन रस्त्याचे काम मार्गी लागावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र भूमिका घेण्याचा इशारा शिवानी सावंत यांनी दिला आहे.


