(रत्नागिरी / संगमेश्वर)
आयुष्यभर नगरपंचायतीची सेवा करून निवृत्त झाल्यानंतर निवांत आयुष्य जगण्याची अपेक्षा असताना, हक्काच्या आर्थिक लाभांसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ देवरुख नगरपंचायतीच्या चार निवृत्त कर्मचाऱ्यांवर आली आहे. निवृत्तिवेतन, रजा रोखीकरण आणि अन्य देय लाभ प्रलंबित असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. नगरपंचायत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने त्यांनी आता राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे.
नियत वयोमानानुसार सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मिळणारे आर्थिक लाभ हे कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा महत्त्वाचा आधार असतात. मात्र, देवरुख नगरपंचायतीतील चार कर्मचाऱ्यांची देणी अद्याप प्रलंबित असल्याने त्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवृत्तीनंतरही आपल्या हक्काच्या रकमेसाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. प्रलंबित आर्थिक लाभांबाबत निवेदन देणाऱ्यांमध्ये पंप ऑपरेटर तथा विद्युततंत्री जोडारी म्हणून कार्यरत असलेले विनोद सुरेश शिंदे (निवृत्ती : ३१ मे २०२५), तारतंत्री तथा वायरमन संतोष नामदेव किर्वे (निवृत्ती : ३० जून २०२५), सफाई कामगार संतोष अर्जुन पवार (निवृत्ती : ३१ मे २०२५) आणि व्यायामशाळा प्रशिक्षक श्रीराम शंकर डाफळे (निवृत्ती : ३१ डिसेंबर २०२५) यांचा समावेश आहे. या चौघांचे निवृत्तिवेतन व अन्य आर्थिक लाभ प्रलंबित असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेले लाभ वेळेत मिळावेत, यासाठी प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे. दीर्घकाळ सेवा बजावल्यानंतर निवृत्तीच्या टप्प्यावर आर्थिक हक्कांसाठी संघर्ष करावा लागणे, ही संबंधित कर्मचाऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत या प्रकरणात हस्तक्षेप करून संबंधित प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीच्या सूचना देणार का, तसेच प्रलंबित देणी कधी मिळणार, याकडे आता निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.


