(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरातील तुटलेल्या संरक्षक कठड्याच्या दुरवस्थेकडे वंचित बहुजन आघाडीने निवेदनाद्वारे नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या निवेदनाची तातडीने दखल घेत मुख्याधिकारी गारवे आणि नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी संबंधित ठिकाणी कार्यवाही करत तुटलेल्या कठड्याचे बांधकाम करून परिसर पूर्ववत केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा हा आंबेडकरी समाजासह समस्त अनुयायांचे श्रद्धास्थान आहे. या पुतळ्याच्या सभोवतालच्या सुशोभीकरणाची आणि संरक्षक कठड्याची झालेली हानी लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या रत्नागिरी तालुका शाखेने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. तसेच, या प्रकाराची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व मजबूत संरक्षक व्यवस्था उभारावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली होती. या निवेदनाची दखल घेत नगर परिषद प्रशासनाने तुटलेल्या कठड्याचे बांधकाम करून परिसर पूर्ववत केल्याने तातडीच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, तुटलेल्या कठड्याचे बांधकाम करून नगर परिषद प्रशासनाने तो पूर्ववत केला असला, तरी कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला वारंवार अशा घटना का घडतात, असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या तालुका सचिव बिपीन आयरे यांनी उपस्थित केला आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी नगर परिषदेने विशेष खबरदारी घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.
तसेच पुतळा परिसरातील संरक्षक कठड्याचे नुकसान टाळण्यासाठी वाहनचालकांना योग्य दिशेने वाहने वळविण्याच्या सूचना देणारा फलक किंवा सूचना फलक कठड्यापासून काही अंतरावर लावण्यात यावा. त्यामुळे वाहनांना वळण्यासाठी पुरेशी जागा मिळेल आणि कठड्याला धडक बसून नुकसान होण्याची शक्यता कमी होईल, असे आयरे यांनी सुचविले. केवळ नुकसान झाल्यानंतर दुरुस्ती करण्यापुरती कार्यवाही मर्यादित न ठेवता, अशा घटना घडूच नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर नगर परिषद प्रशासनाने भर द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी प्रतिक्रियेद्वारे व्यक्त केली आहे.


