(राजापूर/ तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल येथील श्री राधाकृष्ण नवरात्रोत्सव मंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित उपक्रमात कलाकार श्वेता इस्कर हिने साकारलेल्या आकर्षक राधा-कृष्ण रांगोळीने उपस्थितांची मने जिंकली. रंगांच्या सुरेख संगमातून साकारलेल्या या कलाकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या मंडळाच्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील कलाकारांमध्ये असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, त्यांना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने श्री राधाकृष्ण नवरात्रोत्सव मंडळाने हा उपक्रम राबविला. ग्रामीण भागात अनेक प्रतिभावान कलाकार आहेत. त्यांच्या कलेला संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास त्यांच्यातील कलागुणांना अधिक चांगल्या प्रकारे वाव मिळू शकतो, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
श्वेता इस्कर हिने साकारलेल्या मनमोहक राधा-कृष्ण रांगोळीबद्दल मंडळाच्या वतीने तिचा तसेच तिला सहकार्य करणाऱ्या प्रतीक्षा ढवळे हिचा श्रीफळ आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला. या गौरवामुळे स्थानिक कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासही मदत होणार आहे.
धार्मिक उत्सवाच्या पलीकडे जाऊन सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देण्याचा मंडळाचा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे. भविष्यातही अशाच नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करून स्थानिक कलाकारांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा मानस मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ, त्यांच्या कलेला सन्मान आणि नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.


