(रत्नागिरी /प्रतिनिधी)
हातखंबा येथून राजस्थानमधील आपल्या गावी जाण्यासाठी निघालेला २३ वर्षीय तरुण अद्याप घरी पोहोचला नसल्याने तो बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. सुनील कुमार गणपतलाल वर्मा असे या तरुणाचे नाव असून, त्याचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील कुमार वर्मा हा राजस्थान राज्यातील जयपूर जिल्ह्यातील शहापुरा तालुक्यातील बिचपुडी, देवीपुरा येथील रहिवासी आहे. तो २ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १२.४० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथून राजस्थानमधील आपल्या गावी जाण्यासाठी निघाला होता. मात्र, त्यानंतर तो अद्याप घरी पोहोचलेला नाही. सुनीलचा शोध घेण्यासाठी त्याच्या नातेवाइकांनी, मित्रपरिवाराने तसेच कामाच्या ठिकाणी चौकशी केली. मात्र, त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्याला गुप्तपणे आणि बेकायदेशीररीत्या डांबून ठेवण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असावे, असा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.
या प्रकरणी अमरचंद प्रभातराम (वय ३६, व्यवसाय कंत्राटदार, सध्या रा. कट्टा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग; मूळ रा. चिसैनगड, ता. शहापुरा, जि. जयपूर, राजस्थान) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याच्या दृष्टीने पोलीस तपास महत्त्वाचा ठरणार आहे.


