(रत्नागिरी / वार्ताहर)
मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या श्रीरंग जोगळेकर यांनी संवादिनी (हार्मोनियम) वादन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या या अंतिम फेरीत श्रीरंग जोगळेकर यांनी उत्कृष्ट हार्मोनियम वादन सादर करत हे यश मिळवले. त्यांच्या या कामगिरीमुळे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
श्रीरंग जोगळेकर यांना पंडित विश्वनाथ कान्हेरे आणि अनंत जोशी यांचे मार्गदर्शन लाभले असून हेरंब जोगळेकर हे त्यांचे मार्गदर्शक आहेत. वादनाच्या सादरीकरणासाठी वरद जोशी यांनी तबल्यावर साथसंगत केली.
श्रीरंग जोगळेकर यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


