(रत्नागिरी /प्रतिनिधी)
केस कापण्यासाठी जातो, असे आईला सांगून घराबाहेर पडलेला २६ वर्षीय तरुण अद्याप घरी न परतल्याने खळबळ उडाली आहे. सुयोग उत्तम कोलगे असे बेपत्ता तरुणाचे नाव असून, त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुयोग कोलगे हा २० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी चारच्या सुमारास कारवांचीवाडी येथे केस कापण्यासाठी जात असल्याचे आई उल्का उत्तम कोलगे यांना सांगून घरातून बाहेर पडला. मात्र, बराच वेळ उलटूनही तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला आणि नातेवाईकांकडेही चौकशी केली. मात्र, सुयोगचा ठावठिकाणा लागला नाही. सुयोग उत्तम कोलगे (वय २६) हा रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथील मोरया एकतानगर परिसरातील रहिवासी आहे. तो घरातून निघून गेल्यानंतर अद्याप परतला नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
याप्रकरणी सुयोगचे वडील उत्तम सदानंद कोलगे (वय ५४, व्यवसाय एसटी चालक, रा. घर क्रमांक १३०२, मोरया एकतानगर, खेडशी, ता. जि. रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. अज्ञात व्यक्तीने सुयोगचे गैरकायदेशीररीत्या प्रतिबंधित ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण केले असावे, असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम १४०(३) अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ग्रामीण पोलिसांकडून सुयोगचा शोध घेण्यात येत आहे. त्याच्या बेपत्ता होण्यामागील नेमके कारण आणि सध्याचा ठावठिकाणा तपासातून स्पष्ट होणार आहे.


