(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रॅव्हल्सने समोरून येणाऱ्या स्कूटीला धडक दिल्याची घटना राजापूर तालुक्यातील जवळेथर-मिळंद गावांच्या सीमेवर घडली. या अपघातात स्कूटीचालक सुहास सप्रे (वय ३४, रा. जवळेथर, सुर्वेवाडी, ता. राजापूर) जखमी झाले असून, त्यांच्या स्कूटीचे किरकोळ नुकसान झाले आहे. याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात ट्रॅव्हल्सचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास जवळेथर-मिळंद गावांच्या सीमेवर जवळेथर ते पाचल मार्गावरील एका वळणावर हा अपघात झाला. आरोपी गौरव गजानन पवार (वय ३६, रा. वरचीपेठ, राजापूर) हा साई तन्मय ट्रॅव्हल्स (एमएच ०१ ईव्ही ५४९५) घेऊन जात होता. पवार याने रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता वाहन भरधाव वेगाने चालवले. तसेच वाहन रस्त्याच्या चुकीच्या बाजूला नेल्याने समोरून येणाऱ्या हिरो कंपनीच्या प्लेझर स्कूटीला (एमएच ०८ एडब्ल्यू ५३४८) धडक बसली. या धडकेत स्कूटीचालक सुहास सप्रे यांना लहान-मोठ्या तसेच गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमी सुहास सप्रे यांना उपचारासाठी हलविले. अपघातामुळे त्यांच्या स्कूटीचेही किरकोळ नुकसान झाले आहे. याप्रकरणी स्मिता सुहास सप्रे (वय ६२, गृहिणी, रा. जवळेथर, सुर्वेवाडी, ता. राजापूर) यांनी राजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गौरव गजानन पवार याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास राजापूर पोलिस करीत आहेत.


