(जाकादेवी / वार्ताहर)
१९ व्या शतकात सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात फोपावली होती. मुलींना- स्त्रियांना तसेच बहुजनातील समाजातील मागास,वंचित घटकांना मनूवाद्यांकडून शिक्षणाची दारे बंद होती. अस्पृश्य म्हणून गणल्या जाणाऱ्या तसेच तत्कालीन स्त्रियांवरती अमानुष अन्याय केला जात होता. सतीप्रथा क्रुर होती. पशुतुल्य म्हणण्यापेक्षा पशुपेक्षाही हीन प्रकारची वागणूक दिली जात होती.अशावेळी उच्चवर्गीयांच्या विरोधाला न जुमानता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळेच आजच्या स्त्रिया विविध क्षेत्रात उच्च पदावर समर्थपणे कार्यरत आहे. स्वातंत्र्य, समता बंधुता या तत्त्वांचा अंगीकार करून स्वाभिमानी आणि स्वावलंबी जीवन जगत आहेत. सावित्रीबाईंच्या शैक्षणिक कार्यातून स्त्रियांची गुलामीतून मुक्तता झाली .क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीमुळेच सामाजिक परिवर्तन घडून आले. फुले दांपत्य यांचा त्याग आणि ध्यास यांची जाणीव ठेवून आजच्या विद्यार्थी व स्त्रियांनी जुन्या अनिष्ट रूढी परंपरेतून बाहेर येऊन सावित्रीबाई यांचे कार्य अवगत करून वैज्ञानिक दृष्टीकोनातून प्रगतीची शिखरे पादाक्रांत करावीत, असे आवाहन प्रमुख वक्त्याच्या भूमिकेतून व्याख्यात्या राजश्री दळवी जाकादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती प्रसंगी मार्गदर्शन करताना केले.
मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील येथील तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिन, बालिका दिन व स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात आला.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक नितीन मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष पवार यांनी, स्वागत सायली राजवाडकर यांनी तर ज्येष्ठ शिक्षक आभार अरुण कांबळे यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक प्रतिनिधी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालिका दिनाचे औचित्य साधून विद्यार्थीनींचा मान्यवरांच्या हस्ते पुष्प देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

